जव्हार प्रतिनिधी,
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यांत्रिक भातशेतीच्या दिशेने वाटचाल,
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आदिवासी असले तरी बदलत्या हवामान परिस्थितीशी जुळवून घेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये सकारात्मक बदल घडवत आहेत.कृषी विज्ञान केंद्र,कोसबाड यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आता भातशेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत.
भात लागवडीसाठी आधुनिक यंत्रणांचा वापर,
भात ट्रे रोपवाटिका,मॅट पद्धत, राबविरहित लागवड,टोकन पद्धत,सगुणा तंत्रज्ञान,अशा विविध उपाय करून शेतकऱ्यांनी शेतीची दिशा बदलली आहे.२०२५-२६ मध्ये भात लागवडीसाठी यांत्रिकीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या सहा वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे शास्त्रज्ञ भरत कुशारे हे यंत्राद्वारे भातलागवड,ट्रे रोपवाटिका व यांत्रिक पद्धतीने शेती या संकल्पनांचा प्रचार व प्रसार करत आहेत.त्यांच्या प्रयत्नातून कोसबाड,जव्हार तालुक्यातील खरवंद व डेहरे, तसेच मोखाडा तालुक्यातील तुल्याचपाडा,हिरवे,शिंदेपाडा या गावांमधील नऊ शेतकऱ्यांनी यंदा ७.५ एकर क्षेत्रात यंत्राद्वारे भात लागवडीचा प्रयोग केला.
११ व १२ जुलै रोजी मोखाडा तालुक्यातील भोयपाडा, शिंदेपाडा व हिरवे या गावांतील केशव शिंदे,जयवंत शिंदे व नारायण लहारे यांच्या ४.५ एकर शेतजमिनीवर यांत्रिक भात लागवडीचे प्रात्यक्षिक पार पडले.यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुशारे यांच्या मार्गदर्शनाखाली ” राबविरहित भात ट्रे रोपवाटिका,” तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. या पद्धतीत प्रती एकर फक्त ६ किलो बियाण्याची गरज भासते.एकरी साधारण ९५ ट्रेमधून रोपे तयार होतात.ही रोपे केवळ १४-१५ दिवसांत लागवडीसाठी तयार होतात. राब पद्धतीच्या तुलनेत बियाण्याची बचत होते,वेळेची बचत होते आणि फुटवे अधिक मिळतात.परिणामी उत्पादनही वाढते.
वाढते मजुरीचे दर,मजुरांची कमतरता,उत्पादन खर्चात वाढ,वेळेवर लागवड पूर्ण न होणे,यांसारख्या समस्या पार करत यंत्रांच्या मदतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव सकारात्मक ठरत आहे.
जिल्ह्यात सध्या चार ओळीच्या १७ Rice Transplanter मशीन व एक मोठी मशीन उपलब्ध आहे.प्रत्येक मशीन दर खरीप हंगामात सरासरी २२० एकर शेती यांत्रिक पद्धतीने लागवड करू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्र वापरून,माती परीक्षण,योग्य प्रमाणात खतांचा वापर, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यांचा वापर करून आधुनिक व फायदेशीर शेती करावी,असे आवाहन भरत कुशारे यांनी केले आहे.
कोट-
” कमी दिवसात रोपे तयार झाली,बियाणे आणि वेळ वाचला.फुटव्यांची संख्या वाढल्याने उत्पादनही वाढले.गेल्या वर्षी झालेल्या एकूण खर्चापैकी अर्धा उत्पादन खर्च वाचला,”
—केशव शिंदे, शिंदेपाडा, हिरवे,

