दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ; उमेदवारी देताना पक्षाच्या वरिष्ठांना करावी लागणार तारेवरची कसरत,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शिवसेना ( उबाठा ) व मनसे यांची युती झाल्यास वसई तालुक्यातील लढतीचे चित्र कसे असू शकेल ? याविषयी राजकीय विश्लेषकामध्ये मतांतर आहे.काहींच्या म्हणण्यानुसार भाजप व एकनाथ शिंदे गटाला काही अंशी फटका बसू शकतो.तर काहींनी मनसेमुळे बहुजन विकास आघाडीची नालासोपारा शहरात काही प्रमाणात पीछेहाट होऊ शकते.गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने नालासोपारा विधानसभा मतदारसंघात लक्षणीय मते घेतली होती.मनसे व प्रहार जनशक्ती या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी सुमारे तीस हजार मते घेतल्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा या लढतीत मोठ्या फरकाने पराभव झाला होता.त्यामुळे
मनसे येथे शिवसेनेकडे ( उबाठा ) अधिक जागा मागण्याची शक्यता आहे.
भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाल्यास त्याचा अन्य पक्षाना फायदा होऊ शकतो.या शहरात आपली ताकद नगण्य असल्याचे शिंदे गटाला माहीत असून ते मैत्रीपूर्ण लढतीच्या भानगडीत पडणार नाहीत.नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा गेली अनेक वर्षे बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा.पण विधानसभा निवडणुकीत तो भाजपने हिसकावून घेतला.तरीही या शहरात आजही त्यांचे अस्तित्व टिकून आहे.या निवडणुकीत योग्य पद्धतीने तिकीट वाटप झाले तर येथे त्यांना काही जागा नक्कीच जिंकता येऊ शकतात.येथे आघाडीत दोन गट आहेत,दोन्ही गटाला तिकीट वाटपात योग्य वाटा मिळाल्यास आघाडी बऱ्यापैकी कामगिरी करू शकते.आजच्या घडीला भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) शिवसेना ( उबाठा ) मनसे व बहुजन विकास आघाडी या पाच पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी आहे.त्यामुळे उमेदवारी देताना पक्षाच्या वरिष्ठांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.भाजप वगळता इतर चार पक्षात तिकीट वाटपानंतर मोठ्याप्रमाणात बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.दुसऱ्या पक्षातील बंडखोरी ही भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे.मनसेकडे या निवडणुकीसाठी उमेदवार नाहीत,तरीही त्यांच्याकडून जास्त जागांचा आग्रह धरण्यात येईल,असा अंदाज आहे.भाजपची शिंदे गटाशी युती झाली तर भाजप त्यांना हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच जागा देईल.या शहरात शिंदे गटाची ताकद नगण्य आहे,त्यामुळे त्यांच्या वाट्याला चार ते पाच जागा येवु शकतात.तसेच शिवसेना ( उबाठा ) येथे मनसेला चार पेक्षा अधिक जागा देणार नाही.बहुजन विकास आघाडीत दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या राजीव पाटील यांच्या गटाला मानणारे अनेक नगरसेवक आहेत,त्यांना उमेदवारी द्यावी लागेल,त्यांना जर उमेदवारी मिळाली नाही,तर मात्र त्यांच्या नाराजीचा फटका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बसू शकतो.वसई व नायगाव परिसरात तिकीट वाटप सुलभ पद्धतीने होऊ शकते.येथे भाजप,शिवसेना ( उबाठा ) व बहुजन विकास आघाडीचा बोलबाला आहे.शिंदे गटही काही जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.मात्र मनसे कडे येथे उमेदवारांचा दुष्काळ आहे.वालीव व गोखीवरे/सातीवली भागात मनसे जोरात आहे.या दोन ठिकाणी त्यांचे उमेदवार नक्कीच चांगली कामगिरी करतील असा अंदाज आहे.

