जव्हार प्रतिनिधी,
हिवताप व हत्तीरोग नियंत्रण विभागाचे कर्मचारी हक्कांपासून वंचित,
पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन तब्बल १० वर्षे पूर्ण होत आली,तरीही हिवताप हत्तीरोग नियंत्रण विभागाचा आर्थिक व प्रशासकीय कारभार अद्याप ठाणे येथूनच चालवला जात आहे.त्यामुळे पालघर जिल्ह्यातील जवळपास २५० आरोग्य कर्मचारी आजही आपल्या हक्कांपासून वंचित आहेत.
सध्या पालघर जिल्ह्यात हिवताप विभागांतर्गत १७८ आरोग्य सेवक,४२ आरोग्य सहाय्यक,१२ तालुका पर्यवेक्षक व १४ कार्यालयीन कर्मचारी असे कर्मचारी कार्यरत आहेत.हे कर्मचारी आदिवासी व डोंगराळ भागात मलेरिया,डेंग्यू,चिकनगुनिया, जपानी मेंदूज्वर,यासारख्या कीटकजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेहनत घेत आहेत.मात्र,त्यांच्या सेवा नोंदी, वेतन,रजा,वैद्यकीय बिले तसेच पदोन्नतीशी संबंधित सर्व प्रक्रिया ठाणे कार्यालयातून पार पडत असल्यामुळे त्यांना वेळेवर लाभ मिळत नाहीत.या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील हिवताप हत्तीरोग नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.पालघर जिल्हा हिवताप हत्तीरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भुसारे यांनी जाहीर इशारा दिला आहे की, “१५ ऑगस्ट २०२५ पूर्वी जर विभागाचे संपूर्ण आर्थिक व प्रशासनिक स्थलांतर पालघर कार्यालयात करण्यात आले नाही,तर आम्ही लाक्षणिक उपोषण करू.”
ते पुढे म्हणाले, “ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, नियमित सेवा फायदे,स्थानिक पातळीवरील निर्णय क्षमता, यासाठी हे विभागीय हस्तांतरण अत्यावश्यक आहे.याप्रकरणी शासनाने आम्हाला न्याय दिला नाही तर, आम्ही संघटनेच्या वतीने पुढील तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेऊ.”
हिवताप नियंत्रणासाठी रात्रीचा दिवस करून कार्य करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशासनिक पाठींबा मिळावा, ही त्यांची एकमुखी मागणी आहे.शासन व जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का, हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे.

