… आणि खडतर प्रवासाची पायपीट थांबली,
गारगाव व डाहे शाळेतील विद्यार्थ्यांना सायकलची भेट
वाडा :दि.१३
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून अलीकडे समोर आलेल्या बातम्यांमध्ये, विद्यार्थी नद्या ओलांडून आणि कठीण डोंगरी व दुर्गम रस्त्यांवरून शाळेत जात असल्याचे दिसून आले. अनेक विद्यार्थी आजही शाळेत पोहोचण्यासाठी दररोज ३ कि.मी.हून अधिक अंतर पायी चालत प्रवास करतात. अशा पार्श्वभूमीवर जुनून फाउंडेशनने या भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
या उपक्रमाअंतर्गत, १२ जुलै २०२५ रोजी जुनून फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा गारगाव आणि जिल्हा परिषद शाळा डाहे (जिल्हा: पालघर) येथील विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वाडा तालुक्यातील या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करतात अशा विद्यार्थ्यांना नियमित व सुलभरीत्या शाळेत जाता यावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात टोपलेपाडा, आंबेपाडा, फणसपाडा, सुतकपाडा, मुरबीचापाडा तसेच गारगाव, डाहे व कुंभिस्ते या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यावेळी एकूण ५१ विद्यार्थ्यांना सायकल वितरित करण्यात आल्या, ज्यामध्ये १२ मुले व ३९ मुलींचा समावेश होता. या सायकलींमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुलभ व कमी वेळेत होऊन शिक्षणात सातत्य ठेवणे शक्य होईल.
हा कार्यक्रम स्थानिक ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती आणि जुनून फाउंडेशनचे सदस्य यांच्या सहकार्याने पार पडला.
कार्यक्रमाला तिरोडा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य विजय भरतलाल रहांगडाले यांची विशेष उपस्थिती लाभली. ते म्हणाले की, जुनून फाउंडेशनच्या समाजोपयोगी कार्याबद्दल त्यांनी अनेक वर्षांपासून ऐकले असून, प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होता आल्याचा त्यांना आनंद आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत जुनून फाउंडेशनचे सदस्य युवराज पाटील, चिन्मय पाटील, ओंकार घरत, वेद निकम आणि संपूर्ण टीमचे मोलाचे योगदान लाभले. ‘द बायसिकल प्रोजेक्ट’ सलग दुसऱ्या वर्षी राबवण्यात आला असून, जुनून फाउंडेशन गेल्या १३ वर्षांपासून ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. सप्तरंग (ग्रामीण भागातील शाळांसाठी स्नेहसंमेलन व कार्यशाळा), तरंग (खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञानाचे शिक्षण), Joy of Giving (शैक्षणिक साहित्य वाटप), Go Green (वृक्षारोपण) असे विविध उपक्रम प्रत्येक वर्षी या संस्थेद्वारे राबविले जातात. याव्यतिरिक्त संस्थेने निसर्ग वादळाच्या आपत्कालीन परिस्थितीत श्रीवर्धन तालुक्यात मदतकार्य हाती घेतले होते.

