जव्हार येथे वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न.
जव्हार प्रतिनिधी-
श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ( ता. अलिबाग,जि.रायगड ) यांच्या प्रेरणेने आणि सौजन्याने तसेच श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ श्री बैठक कळमविहिरा येथील सदस्यांनी वृक्षारोपण व संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबवला.या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाशी नाळ जुळवणारा,भावी पिढीला शुद्ध पर्यावरण देण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पर्यावरण पूरक वृक्षांचे रोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ग्रामपंचायत शिरोशी सरपंच कु.योगिता यशवंत शेंडे,उपसरपंच दीपक शंकर पवार,प्रमोद गोविंद शेंडे, तुकाराम गणपत मुकणे,मोहन कामडी आदी मान्यवर उपस्थित होते.श्री बैठक सदस्य,ग्रामस्थ तसेच जयेश्वर विद्यामंदिर,डेंगाचीमेट येथील विद्यार्थीनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.सर्वांनी एकत्र येऊन झाडे लावली आणि त्यांच्या देखभालीची जबाबदारीही स्विकारली.
कार्यक्रमा दरम्यान सरपंच योगीता शेंडे म्हणाल्या की, “आजच्या पिढीला शुद्ध हवा, पाणी व हिरवेगार निसर्ग देण्यासाठी,अशा उपक्रमांची अत्यंत गरज आहे.प्रत्येक व्यक्तीने वर्षाला किमान एक तरी झाड लावावे व जगवावे, हीच नानासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने गेल्या अनेक वर्षांपासून समाजप्रबोधना सोबत पर्यावरण रक्षणासाठीही भरीव कार्य केले आहे.त्यांच्या प्रेरणेने आज अनेक गावांमध्ये वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमा राबवण्यात येत आहेत.हा उपक्रम केवळ एक दिवसाचा नसून,लावलेली झाडे जगवण्याची,त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी सर्वांनी उचलल्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.
” झाडे लावा,झाडे जगवा,” निसर्ग वाचवा,भविष्य सुरक्षित करा,” या पर्यावरण संदेशासह संपूर्ण गावाने एकत्र येत निसर्ग संवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे.

