दीपक मोहिते,
पालघर जिल्ह्यातील सुमारे ४० गावांना सतर्कतेचा इशारा..
पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस होत पालघर,डहाणू, वाडा,विक्रमगड,या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.पावसाच्या संततधारेने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे.
सूर्या प्रकल्पा अंतर्गत धामणी धरणात २२८ दशलक्ष घ.मी. ( ८२ % ) पाणीसाठा निर्माण झाला असून धरणातील पाण्याची पातळी स्थिर राखण्यासाठी तीन दिवसांपूर्वी धरणाचे तीन दरवाजे ४० सें.मी.ने उघडण्यात आले असुन सूर्या नदीपात्रात १४ हजार ३३७ क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.
गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढला असून मागील २४ तासात २५४ मि.मी.पाऊस पडला.धरण प्रकल्प क्षेत्रात आत्तापर्यंत एकूण १ हजार ५३० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे.त्यामुळे काल सकाळी धामणी धरणाचे सर्वच्या सर्व पाच दरवाजे ४० सें.मी.ने उघडण्यात आले आहेत.त्यातून सुमारे ४ हजार ६१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धामणी धरणातून कवडास बंधाऱ्यात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कवडास बंधारा ४४.७७ टक्के भरला आहे.बंधाऱ्याच्या सांडव्यावरून सूर्या नदीपात्रात सुमारे ४५ हजार ०७ क्युसेक्स प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून डहाणू आणि पालघर तालुक्यातील दोन्ही काठावरील वाघाडी,वेती, कासा,वरोती,चारोटी,घोळ, भराड,निकावली,आंबिवली, धामटणे,पेठ,म्हसाड,उर्से, नानिवली,साये,आंबिस्ते, आकेगव्हाण,चिंचारे,गारगाव, बोरशेती,किराट,माकडचोळा, लालोंडे,गुंदले,नागझरी,निहे, लोवरे,गिरनोळी,सागावे, काटाळे,कोकणेर,मासवण, चहाडे,वसरे,विश्रामपूर, लालठाणे,तांदुळवाडी, पारगाव,नावजे,गिराळे या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या स्थितीनुसार सूर्या नदीपात्रात करण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी अधिक प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचे पालघर पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

