दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कितीही बदल होवो,पण वसईकरांचे हाल काही थांबत नाहीत,
गेल्या काही दिवसापासून पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून वसई/विरार अनेक परिसर पाण्याखाली गेले आहेत.” नेमेची येतो पावसाळा,” उक्तीप्रमाणे यंदाही वसई विरार महानगरपालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत.नालेसफाईची बोगस कामे सुरू असताना त्या ठिकाणी उभे राहून सेल्फी काढणाऱ्या लोकप्रतिनिधीवर आता तोंड लपवण्याची पाळी आली आहे.
सात महिन्यापूर्वी वसई तालुक्यात सत्ताबदल झाल्यानंतर वसईकरांनी आपल्याला सुगीचे दिवस येतील,अशी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली होती.पण तालुक्यातील सद्यस्थिती पाहिल्यानंतर त्यांची ही स्वप्ने ” मुंगेरीलालके हसीन सपने,” ठरली आहेत.यंदाही नालेसफाईच्या कामात ठेकेदार व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपले हात. चांगलेच धुवून घेतले आहेत.
गेल्या चार दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे चार शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले.अनेक नागरिक व व्यापाऱ्यांच्या घरात व दुकानात पाणी शिरून त्यांच्या मालमत्तेचे अपरिमित नुकसान झाले आहे.यंदा ही शहरे पाण्याखाली जाऊ नयेत,यासाठी रस्त्याची उंची वाढवणे,पावसाळी पाण्याचा निचरा व्हावा,यासाठी मार्ग मोकळा करणे व शहरातील मोठे नाले साफ करणे,इ.कामे हाती घेण्यात आली होती.या सर्व कामावर कोट्यवधी रु.खर्च झाले.पण ही सर्व कामे तकलादू स्वरूपाची झाल्यामुळे वसईकरांना यंदाही यातना भोगाव्या लागत आहेत.दोन्ही आमदारांनी या प्रश्नी संबधित ठेकेदार व मनपाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले पाहिजे.पण तसे होणे शक्य नाही,कारण यामध्ये फार मोठे अर्थकारण दडलेले आहे.सेल्फी काढून किंवा मागण्यांची निवेदने देऊन वसईकराना दिलासा मिळवून देता येणार नाही,त्यासाठी या आमदारांनी आपल्या कर्तव्यात कठोर असायला हवे.एकेकाळी आपण अशा विविध प्रश्नांवर मोर्चे,धरणे व घेराव घालणे,अशी आंदोलने करत होतो,त्याचा त्यांनी विसर पडू देऊ नये,एवढीच वसईकरांची इच्छा आहे.

