रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल,
तालुक्यातील निंबवली – पालसई या रस्त्याची पार दुरावस्था झाली असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असुन रस्त्याची चाळण झाली आहे.
त्यामुळे या रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या वाहन चालकांना पाठदुःखीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्यांची भीतीने गाळण उडत आहे.तर,मिनी डोर व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.त्यांना आठ कि.मी. अंतराचा प्रवास पायी करावा लागतो.त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका सचिव सागर पाटील यांनी बांधकाम प्रशासनाला दिला आहे.
निंबवली- पालसई हा रस्ता १७ कि.मी.अंतराचा असून १२ कि.मी.अंतराचा रस्ता दोन वर्षांपूर्वी जिजाऊ कंट्रक्शन या ठेकेदार कंपनीने बनवला होता.ते काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत.त्यामुळे कोशिमशेत,नांदणी, गायगोठा, अंबर भुई आदी सहा गावांसह १५ पंधरा गाव पाड्यातील वाहन चालकांना मानदुखी,पाठदुखी व कंबरदुखीचे आजार सुरू झाले आहेत.वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.आबालवृद्ध,रुग्ण, विद्यार्थी,गरोदर माता, नोकरदार,भाजीपाला उत्पादक शेतकरी यांनाही प्रचंड त्रास होत आहे.या भागातील समस्या सोडवण्याचे आश्वासन आ.शांताराम मोरे यांनी नागरिकांना दिले होते. परंतु,ते हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन किमान वाहतुकीस योग्य अशी तरी दुरुस्ती करून या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

