वसंत भोईर,वाडा
वाड्यात भातलावणीला सुरुवात,
जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर जिल्हातील सर्वच तालुक्यातील गाव पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.मात्र एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाल्यामुळे वाडा तालुक्यात मजुरांची कमतरता भासू लागली आहे.त्यामुळे विक्रमगड, तलासरी,जव्हार,मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजुर आणावे लागत आहेत.ततसेच मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत.एका शेतमजुराला दररोज ४५० ते ५०० रू.सकाळी न्याहरी, दुपारी जेवण द्यावे लागते.यामुळे शेती हा जास्त कष्टाचा आणि खचिॅक व्यवसाय होऊ लागला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चिक शेती परवडत नाही.
तालुक्यात १७६ गावे २०० हून अधिक पाडे असून १५ हजार हेक्टर क्षेत्र भातपीका खाली आहे.येथील शेती पावसावर अवलंबून आहे.येथे झिनी (वाडा कोलम),सुरती,सुवर्णा,जोरदार,वाय.एस.आर,मसुरी,एककाडी,गुजरात ११,गुजरात -१३, वाडा झिनिया, रत्नागिरी-७,रत्नागिरी-८,रत्ना,जया,कर्ज आदी भातांच्या वाणांची लागवड करून उत्पन्न घेत असतात.
भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणा-या वाडा तालुक्यात एकेकाळी मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या होती.पण १९९५ पासून या तालुक्यात उद्योगधंदे आल्यामुळे येथील मजुर निरनिराळ्या उद्योग व व्यवसायामध्ये कामाला लागले आहेत. शिवाय बांधकामासाठी शहरात व नदी खाडी किनारी वर्षभर रेती काढण्यासाठी शेकडो मजुर जात असल्यामुळे मजुरांची टंचाई जाणवत आहे.भातलावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना ती परवडत नाहीत. त्यामुळे येथील भात शेती संकटात सापडली आहे.

