जव्हार,प्रतिनिधी
जव्हार येथे कृषी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न,
कै.वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त, पंचायत समिती,जव्हार येथे कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ” कृषी दिन,” उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.त्यानंतर तालुका कृषी अधिकारी जयराम आढळ यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करत कृषी दिनाचे ऐतिहासिक, सामाजिक महत्त्व विशद केले आणि कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
या कार्यक्रमात सुनील कामडी (रा.डेंगाची मेट) यांना ” वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०१७ (आदिवासी गटात प्रथम क्रमांक)” प्राप्त झाल्याबद्दल गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांच्या हस्ते शाल,रोप व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.तसेच जव्हार तालुक्यातील पीक स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच विविध योजनांचे लाभार्थी शेतकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे तयार करण्यात आलेली योजनांची माहिती पुस्तिका शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्या.सुनील कामडी यांनी आपल्या प्रयोगशील शेतीबाबत सविस्तर माहिती देताना,त्यांनी विकसित केलेल्या “अश्विनी,” भात वाण, मोगऱ्याची लागवड,मोगरा उत्पादक संघ आणि फुलशेती यासारख्या उपक्रमांचे अनुभव उपस्थितांसोबत शेअर केले.देहरे गावचे युवा शेतकरी दत्तू भोये यांनी स्वतःच्या शेती प्रवासाबद्दल बोलताना युवा पिढीसाठी महत्वपूर्ण विचार मांडले.दिलीप भोये यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे आणि महत्त्व विशद करत पर्यावरणस्नेही शेतीच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांनी आधुनिक व तांत्रिक शेती,जलसंधारणाचे महत्त्व,पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना,यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी पंचायत समिती कार्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कृषी विस्तार अधिकारी प्रणित उपाध्ये,प्रियांका भगत,तसेच मंडळ अधिकारी व सहा.कृषी अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका व्यवस्थापक ( पेसा ) मनोज कामडी यांनी केले.

