दिपक मोहिते,
कृषी विशेष दिन,
कृषीक्षेत्र घटण्याच्या प्रक्रियेला प्रचंड वेग,
आज १ जुलै रोजी राज्यात सर्वत्र कृषीदिन साजरा करण्यात येणार आहे.हरित क्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचा १ जुलै हा जन्मदिवस,त्यानिमित्ताने राज्य सरकार दरवर्षी हा दिवस कृषीदिन म्हणून साजरा करत असते.आज राज्यभरात शासनस्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
१९७० च्या दशकात राज्यात अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती.त्यावर उपाययोजना करण्याकामी वसंतराव नाईक यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.आपले राज्य अन्नधान्याच्या बाबतीत कसे स्वयंपूर्ण होईल,यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते.त्याकाळात असलेली अपुरी संसाधने व प्रतिकूल परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी विविध उपाय योजले होते.त्यामुळे राज्याच्या कृषिक्षेत्रात क्रांती घडून आली व आपले राज्य कृषिक्षेत्रात सुजलाम – सुफलाम होऊ शकलो.
शेतकरी हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असून शेती ही टिकली पाहिजे,अशी त्यांची विचारधारा होती.त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम कृषी विद्यापीठ स्थापन केले.या विद्यापीठाच्या माध्यमातून कृषीविषयक विविध प्रयोग करण्यात आले.त्यामुळे आज आपले राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले.त्याचे सारे श्रेय नाईक यांच्या दुरदृष्टीला जाते.मात्र त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाला आता तडे जाऊ लागले आहेत.त्यानंतरच्या काळात सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने कृषी क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.त्यामुळे शेती व बागायती क्षेत्राला आता उतरती कळा लागली आहे.आपल्या राज्यातील शेती ही प्रामुख्याने पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे.परंतु बदलते हवामान,निसर्गाचा लहरीपणा,
शेतीसिंचनासाठी पाण्याचे अन्य स्रोत उपलब्ध न करणे, ( धरणे बांधणे,बंधारे उभारणे ) बी-बियाणे व खते विक्रीतील गैरप्रकार व शेतमालाला हमीभाव न देणे,अशा कारणामुळे कृषी क्षेत्र सतत घटत गेले.परिणामी आर्थिक परिस्थितीमुळे मेटाकुटीस आलेला बळीराजा आत्महत्येच्या वाटेवर मार्गस्थ झाला.मुंबई लगत असलेल्या पालघर,ठाणे व रायगड या तीन जिल्ह्याच्या कृषिक्षेत्राची प्रचंड पीछेहाट होत गेली.पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात पिकणाऱ्या वाडा कोलम,या तांदळाच्या जातीने एकेकाळी स्थानिक भूमिपुत्रांना चांगले आर्थिक वैभव मिळवून दिले होते,तो तांदूळ आता इतिहासजमा झाला आहे.पण त्याची दखल एकाही सरकारने घेतली नाही.गेल्या सत्तर वर्षात सरकारने राज्यात एकही धरण बांधले नाही,पण ७० हजार कोटी रु.सिंचन घोटाळ्याने राज्य देशभरात बदनाम झाले.ज्यांनी हा घोटाळा केला,त्यांना ” चक्की पिसिंग,” करायला लावणारे भाजपचे नेते आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळतात.त्यामुळे नवीन पिढी आता कृषी क्षेत्राकडे वळण्यास तयार नाही.ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून ती पुन्हा अन्नधान्य टंचाईला आमंत्रण देणारी ठरणार आहे.

