जव्हार प्रतिनिधी,
” याची देही, याची डोळा,” – जव्हारमध्ये दुसऱ्या वर्षी भव्य जगन्नाथ रथयात्रा संपन्न.
जव्हार नगरीत दुसऱ्या वर्षीही “ याची देही, याची डोळा,” या दिव्य अनुभूतीने भरलेली आणि भक्तिरसात न्हालेली भव्य श्रीजगन्नाथ रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. पुरीच्या चार धामांपैकी एक असलेले जगन्नाथ धाम जव्हारमध्ये साकार होत असून,या प्राचीन परंपरेचा तेजस्वी वारसा इथेही दृढ होत असल्याचे स्पष्ट दिसून आले.रथयात्रेची सुरुवात राजे यशवंतराव मुकणे महाराज यांच्या पुतळ्यापासून झाली. रथाने राम मंदिर आणि प्रगती प्रतिष्ठान मार्गे नगरपरिक्रमा करत शहरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण केले.
रथ ओढताना महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. रस्त्यावर फुलांची पखरण, गुलालाचे उधळण आणि “ हरे कृष्ण,” च्या गजराने संपूर्ण जव्हार भक्तिरसात न्हालं होतं.या रथयात्रेचे आयोजन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ ( इस्कॉन ) – गोवर्धन इको व्हिलेज आणि जव्हार येथील स्थानिक भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. संपूर्ण आयोजन अत्यंत सुस्थितीत आणि भक्तिपूर्वक पार पडले.अभय गौरांग प्रभूंनी आपल्या सुलभ भाषेत जगन्नाथ,बलराम आणि सुभद्रा देवी यांच्या स्वरूपाचे विवेचन करत आध्यात्मिक जीवनाचे महत्त्व उलगडून दाखवले. त्यांचे प्रवचन ऐकताना भाविक मंत्रमुग्ध झाले होते. रथ मार्गावर विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी गीत-नृत्य सादर केले,तर संपूर्ण मार्गावर मृदंग, करताल आणि ढोलाच्या तालावर हरिनाम संकीर्तन होत होते.महिलांची विशेष गर्दी हे यंदाचे खास वैशिष्ट्य ठरले.रथ प्रगती प्रतिष्ठान येथे पोहोचल्यानंतर श्रीजगन्नाथ, बलराम व सुभद्रादेवी यांना पारंपरिक पद्धतीने ५६ भोग अर्पण करण्यात आले. त्यानंतर भावपूर्ण महाआरती पार पडली आणि उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.या पवित्र सोहळ्यास विक्रमगड विधानसभा आ. हरिश्चंद्र भोये, माजी सभापती ज्योतीताई भोये,माजी आ.सुनील भुसारा,माजी उपनगराध्यक्ष दादाशेठ तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस प्रशासन,नगरपरिषद, वीज विभाग आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य रथयात्रेच्या यशात महत्त्वाचे ठरले.इस्कॉनतर्फे सर्वांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी दर गुरुवारी होणाऱ्या सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. लवकरच गीता अभ्यासवर्ग, हरिनाम सप्ताह व अन्य उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.या पवित्र रथयात्रेत जव्हारसह मोखाडा, खोडाळा,पाथर्डी,डोहरेपाडा, साकुर आदी गावांमधून अनेक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संपूर्ण रथयात्रा शिस्तबद्ध,भावपूर्ण आणि आध्यात्मिकतेने भरलेली होती. “ जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे,” हीच प्रार्थना प्रत्येक भाविकाच्या ओठांवर होती.

