सुरेश काटे,तलासरी
‘राणी दुर्गावती नर्सरी’ ठरतेय पर्यावरणाचे प्रतीक,
तलासरी तालुक्यातील पीएम श्री शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा,वरवाडा येथे नुकताच
एक आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला.शाळेतील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘राणी दुर्गावती नर्सरी,’मध्ये तब्बल पंधराशे झाडांची रोपे तयार करण्यात आली.
या नर्सरीतून फुलझाडे, शोभेची झाडे,तसेच विविध उपयोगी वनस्पतींची रोपे तयार करण्यात आली.आणि ती शाळेच्या आवारात तसेच शेजारी असलेल्या गोलेरी डोंगरीवर लावण्यात आली. डोंगरी भागात जेथे पूर्वी मोकळं आणि रखरखीत वातावरण होतं,तेथे आता हिरवळ पसरू लागली आहे.
हा उपक्रम केवळ वृक्षारोपणाचा नव्हे,तर विद्यार्थिनींच्या पर्यावरणविषयक जाणीव, समर्पण आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनाचा ठोस पुरावा आहे.
यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक,मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
” हरित भविष्यासाठी शाळेपासून सुरुवात,” या संकल्पनेने प्रेरित होऊन विद्यार्थिनींनी केवळ नर्सरी तयार केली नाही,तर झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही स्विकारली आहे.
या उपक्रमामुळे शाळा परिसरात जैवविविधता वाढेल,तापमानात घट होईल, आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी आस्था वाढेल,असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी वृंद यांनी यावेळी व्यक्त केला.

