वसंत भोईर,वाडा
श्रमजीवी संघटनेचे आंदोलन स्थगित,
भिवंडी- वाडा- मनोर या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात श्रमजीवी संघटनेने नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले. डाकिवली फाटा,कुडूस,शिरीष पाडा,खंडेश्वरी नाका या चार ठिकाणी एकाच वेळी रस्ता कार्यकर्त्यांनी रोको आंदोलन केले.
तब्बल बारा तास चाललेले हे आंदोलन रात्री ११.३० वाजता लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.संघटनेचे शिष्टमंडळ आणि ठाणे व पालघर जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे,कार्यकारी अभियंता सचिन पाटील,वाडा उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झाल्टे पाटील,जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे
भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले,वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे,यांच्यासह महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चेनंतर मार्ग निघाला.
या प्रकरणाची जबाबदारी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यावर देण्यात आली असून,या प्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी लवकरच सुरू होईल,असे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर रात्री ११.३० वाजता हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, सरचिटणीस विजय जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे,पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड,प्रवक्ते प्रमोद पवार,संघटक सचिव सीता घाटल,किशोर मढवी,सुनील लोणे यांनी केले.

