वसंत भोईर,वाडा
विजय गांगुर्डे सेवेतून बडतर्फ,२७ कोटींच्या वसूलीचे आदेश,
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना धान्य खरेदीत केलेल्या कोट्यावधी रु.च्या गैरव्यवहार प्रकरणी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांच्यावर सुमारे २७ कोटी रु.ची वसुली लावण्यात आली आहे.असा आदेश महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिला आहे.त्यामुळे आदिवासी विकास महामंडळात प्रचंड खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आधारभूत धान्यखरेदी करण्यात येते.गांगुर्डे हे जव्हार येथील प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक असताना आधारभूत धान्य खरेदी हंगाम सन २०२२ – २३ अंतर्गत शहापूर येथील उप प्रादेशिक कार्यालयांतर्गत पळशीण ( खर्डी), साकडाबाव,न्याहाडी,खांडस ( सुगवे ) व वेहलोळी या आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर धान्य खरेदीत प्रचंड गैरव्यवहार झाला होता. त्यावेळी सुमारे ८६ हजार ६३४ क्विंटल धान्य व २ लाख १७ हजार ८९७ नग बारादानाचा अपहार करून
महामंडळाचे पर्यायाने शासनाचे सुमारे २६ कोटी ५१ लाख १३० रु.चे आर्थिक नुकसान केले आहे. तर रब्बी हंगामातही लागवड केली नसतानाही बोगस खरेदी दाखवून गांगुर्डे यांनी १ कोटी ४ लाख ४ हजार ५८८ रु.चा गैरव्यवहार झाला.अशा विविध प्रकारे गांगुर्डे यांनी बोगस खरेदी व वाहतूक दाखवून कोट्यवधी रु.चा गैरव्यवहार केल्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
त्यानंतर या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी तुषार मोरे यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या चौकशीअंती गांगुर्डे यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले होते.दरम्यान नैसर्गिक न्याय तत्वानुसार गांगुर्डे यांना म्हणणे मांडण्यासाठी वारंवार संधी देण्यात आली होती.मात्र ते एकदाही चौकशी समितीपुढे हजर झाले नाहीत.वैद्यकीय कारणे देत चौकशी समितीसमोर जाण्याचे त्यांनी टाळत समितीने ठेवलेल्या दोषारोपांवर लेखी खुलासा सादर केला.परंतु दोषारोप खोडून काढण्यासंदर्भात कोणतेही सबळ पुरावे ते देऊ शकले नाहीत.त्यामुळे गांगुर्डे यांचा खुलासा फेटाळून लावत त्यांच्यावर चौकशी समितीने लावलेले दोषारोप मान्य करत बडतर्फीची कारवाई करण्यात आली.त्यांच्याकडून सुमारे २७ कोटी ९१ लाख ५५ हजार २३२ रु.ची वसुली करण्यात यावी,असा आदेश महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी नुकतेच दिले आहेत.

