जव्हार प्रतिनिधी,
शिरोशी कातकरीपाडा पूल पाण्याखाली,ग्रामस्थाना ५ कि.मी.चा फेरा,
जव्हार तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरोशी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या कातकरी पाड्याचा मुख्य मार्गावरील मोरी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे या पाड्याचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला आहे.नागरिक,शेतकरी, विद्यार्थी आणि आजारी व्यक्ती यांना अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
या पाड्याला कळमविहिर मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध असला तरी,त्या मार्गाने नागरिकांना ५ कि.मी.चा अतिरिक्त फेरा मारून जावे लागत आहे,जो आबालवृद्ध,लहान मुले, महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे.पावसाळ्यात वाहतूक साधनांचा असलेला अभाव, यामुळे पर्यायी मार्गही अनेकदा असुरक्षित ठरतो.
दरवर्षी पावसाळ्यात ही मोरी पाण्याखाली जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली नाही. ग्रामस्थांच्या मते,जर या ठिकाणी उंच पूल उभारण्यात आला,तर या समस्येवर कायमचा तोडगा निघू शकतो.
स्थानिक ग्रामस्थांनी आमदार, तहसीलदार आणि पंचायत समितीकडे मागणी करत स्पष्ट केले आहे की, ” ज्यांना दररोजचा प्रवास करावा लागतो,त्यांच्या दृष्टिकोनातून हा पूल नव्हे तर एक जीवनरेषा आहे.”
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की,ही समस्या केवळ वाहतूक व्यवस्थेपुरते मर्यादित नाही, तर शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी आहे.त्यामुळे प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन उंच पूल उभारणीसाठी पावले उचलावीत,अशी मागणी पंचक्रोशीत जोर धरत आहे.

