वसंत भोईर,वाडा
मानीचा पाडा गेल्या तीन दिवसापासून नॉट रिचेबल,
तालुक्यातील गो-हे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मानीचा पाडा गावातील पूल गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.येथील गांवपाडा व कातकरी वाडी अशा दोन गावातील ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय झाली आहे.
गो-हे ग्रामपंचायत हद्दीतील मानीचा पाडा हे गाव ३० घरांचे तर कातकरी वाडी पंधरा-वीस घरांची आहे.दोन्हीही गावे शंभर टक्के आदिवासी लोक वस्ती असलेली गावे आहेत.या गावातील नागरिकांसाठी येय-जा करण्यासाठी असलेले छोटे पूल गेल्या तीन दिवसापासून पाण्याखाली गेल्याने या गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
या गावातील विद्यार्थी गो-हे येथे शाळेत जात असतात. या विद्यार्थ्यांची तीन दिवसापासून शाळा बंद असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तर गर्भवती माता, आबाल वुद्ध,शेतकरी यांचेही प्रचंड हाल होत आहेत.
सदर रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे त्यांनाही आम्ही कळवतो आणि आमच्याकडून ही प्रस्ताव करून या गावासाठी एक मोठा पूल करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू.
– संजय डोंगरे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा
या गावासाठी पुल व्हावा, यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत आहे.परंतु पूर्तता न झाल्याने तो लाल फितीत अडकला आहे त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत आहे.
– अनिल खिल्लारे, उपसरपंच ग्रामपंचायत गो-हे

