दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
धुपप्रतिबंधक बंधारा नसल्यामुळे भुईगाव समुद्रकिनाऱ्यावरील वनसंपदा धोक्यात,
५ जून रोजी राज्यात सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.जनजागृती,चर्चासत्रे, भित्तीपत्रके तसेच अनेक उपक्रम या दिनी राबवण्यात आले.त्यानंतर मात्र सर्वत्र सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
पालघर जिल्ह्यात दररोज पर्यावरण विषयक असलेल्या कायद्याची पावलोपावली पायमल्ली होत असते.वृक्षतोड,वाळूचोरी,जंगल परिसरात होणारी मातीचोरी व अनधिकृत दगडखाणी इ.गैरप्रकारामुळे पालघर जिल्हा अत्यंत संवेदनशील असा बनला आहे.गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस,वादळी वारे व प्रचंड उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्याची प्रचंड धूप होत आहे.गेल्या आठवडाभरात भुईगाव या निसर्गरम्य समुद्रकिनारी आदळलेल्या लाटांमुळे झाडांची मोठ्याप्रमाणात पडझड झाली.या समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा,अशी मागणी गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक रहिवासी करत आहेत.पण संबधित विभाग त्याकडे डोळेझाक करत आहे.त्यामुळे भविष्यात येथे धुपप्रतिबंधक बंधाऱ्या अभावी सुरुच्या बागातील झाडे नामशेष होतील,अशी भिती व्यक्त होत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या गंभीर विषयाची दखल घेऊन उचित कारवाई करावी,अशी मागणी पर्यावरण क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करणाऱ्या मॅकेंझी डाबरे यांनी शासनाकडे केली आहे.

