जव्हार प्रतिनिधी,
ग्रामस्थाच्या श्रमदानातून विहिरीची यशस्वी दुरुस्ती,
पावसाळा सुरू झाला की अनेक ग्रामीण भागांतील पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र होत असतो. या पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यातील पिंपळशेत/कोतीमाळ गावात नागरिकांनी स्वखर्चातून आणि श्रमदानातून एक प्रेरणादायी उपक्रम राबवत नादुरुस्त विहिरीची दुरुस्ती करण्यात आली.या उपक्रमामुळे गावात शुद्ध आणि सुरक्षित पाण्याचा स्रोत पुन्हा कार्यान्वित झाला आहे.
गावातील जुनी विहीर गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत पडून होती. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाण्याचा वापर करावा लागत असे. परिणामी आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती.याचा थेट फटका महिला,लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत होता.
या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ता कु. कमलेश पागी यांनी पुढाकार घेऊन गावातील युवक,महिला आणि मुलांना एकत्र केले व श्रमदानाने ही विहीर दुरुस्त केली तसेच विहिरीतील गाळ काढला. तसेच विहिरीच्या कडेला संरक्षण भिंत बांधली व पाण्याचा मार्ग मोकळा केला. ही सर्व कामे श्रमदानातून पूर्ण करण्यात आली.या उपक्रमात गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोट-
सामाजिक कार्यकर्ता कमलेश पागी म्हणाले,
” विहीर खूप वर्षांपासून नादुरुस्त होती.पावसाळा आला की गावातील नागरिक याच विहिरीतील पाणी वापरत असत.पण पाणी शुद्ध नसल्यामुळे आजारांमध्ये वाढ होत होती.हे चित्र बदलण्यासाठी गावकऱ्यांना सोबत घेऊन विहीर श्रमदानातून दुरुस्त केली. आता गावाला शुद्ध व योग्य पिण्याचे पाणी मिळणार आहे.”
या उपक्रमामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नसून गावाचा स्वयंस्फूर्त सहभाग आणि सामाजिक ऐक्याचा एक आदर्श निर्माण झाला आहे. भविष्यातील अनेक ग्रामविकास उपक्रमांसाठी ही एक दिशादर्शक पायरी ठरणार आहे.

