वसंत भोईर,वाडा
शुद्ध बियाणे व समृद्ध शेती याविषयी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी ?
पालघर जिल्ह्यात मान्सून नुकताच दाखल झाला आहे.आता पेरण्यांची लगबग सुरू होणार आहे.पिकांची अधिक वाढ होऊन चांगले उत्पादन होण्यासाठी गुणवत्ता पूर्व बियाणे आवश्यक आहे. त्यामुळे बियाण्यांची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून,कंपनीच्या जाहिराती वाचून शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करू नये.बियाणे खरेदी करताना खबरदारी घ्यावी,खरेदी करावयाचे बियाणे वाण,जात यांची आपल्या भागासाठी शिफारस केली आहे का,हे जाणून घ्यावे.निवडलेले वाण कोणत्या किडीसाठी अथवा रोगासाठी विकारक्षम किंवा सहनशील आहे का ? निवडलेले वाण किती कालावधीसाठी आहे,त्याची वैशिष्ट्ये कोणती ? याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.
शेतात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बियाणे गुणवत्तापूर्ण असणे महत्त्वाचे आहे.बियाण्यांची शुद्धता,उगवण क्षमता तपासावी,आणि मग बीज प्रक्रिया करावी.खरीप हंगामाला सुरुवात झाली असुन अधिक उत्पादन वाढ होण्यासाठी दर्जेदार बियाणे आवश्यक आहे.
खरेदी केलेल्या बियाण्यांची विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी.या बिलामध्ये अंतिम तारीख,शेतकऱ्याचे नाव,पूर्ण पत्ता स्पष्ट लिहावे.पावतीवर विक्रेता व शेतकऱ्याची सही असणे आवश्यक आहे. छापील किमतीपेक्षा जास्त भावाने बियाणे खरेदी करू नये.खाजगी क्षेत्रातील संशोधित केलेले टूथ फुल ( सत्यता दर्शक) बियाणे निवडायचे असेल,तर एकच वाण सर्व क्षेत्रासाठी न निवडता क्षेत्रानुसार दोन ते तीन वाण निवडावेत.याचा लागवडीनंतर चांगला अभ्यास, अधिक उत्पादनाचे प्रलोभन कुणी दाखविल्यास ते वाण अपरिचित असतील,तर निवड करू नये.यातून फसगत होऊ शकते,असे कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
१९६६ चा बियाणे कायदा शासनाने बियाणांच्या गुणवत्ते नियमन करण्यासाठी आणि बियाणे उद्योगाशी संबंधित बाबीसाठी आहे. बियाणांची शुद्धता,उगवण क्षमता अन्य आवश्यक गुणधर्म निश्चित करणे,वाणाचे प्रमाणीकरण,चाचणी करण्यासाठी शासन समिती स्थापन करणे व अन्य बाबींचा उल्लेख या कायद्यामध्ये आहे.
प्रमाणित बियाणांच्या प्लास्टिक बॅगला पॅकिंग असते व त्यावर मजकूर असतो.बियाणे खरेदी करताना लेबलवरील माहिती पहावी. पिकाचे नाव,जात,उगवण शक्ती,भौतिक व अनुवंशिक शुद्धता टक्केवारी,बियाणे चाचणी,तारीख, महिना व वर्ष,बीज प्रक्रियेला वापरलेले रसायन,बियाणे खरेदी बिलावर छापील बिल क्रमांक असावा.
शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक दुकानातूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी. फसवणूक झाल्यास कृषी विभागाकडे किंवा पथकाकडे तक्रार नोंदवावी,प्रलोभनाला बळी पडू नये.
– संजय घरत, कृषी अधिकारी,

