दीपक मोहिते,
मागील वीस वर्षाचा बॅक लॉग भरून काढू – मुख्यमंत्री फडणवीस,
लोकसंख्या वाढीच्या तुलनेत गेल्या वीस वर्षांत या तालुक्यातील लोकांना नागरी सुविधा मिळाल्या नाहीत.त्यामुळे विकासाचा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता कामाला लागा,आपल्याला विधानसभा निवडणुकीत जसे परिवर्तन घडवले,तसेच परिवर्तन या महानगरपालिका निवडणुकीत घडवायचे आहे,असे उदगार मुख्यमंत्री यांनी वसई येथे झालेल्या कार्यक्रमात काढले.मुख्यमंत्री फडणवीस हे आज वसईच्या दौऱ्यावर आले होते,त्यावेळी ते बोलत होते.
वसई येथे वसई- विरार महानगरपालिकेच्या डी.एम.पेटिट इस्पितळाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण तसेच वसईच्या आ.स्नेहा दुबे यांच्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी वसईत आले होते.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले,मुंबई महानगरपालिका व आसपासच्या महानगरपालिका क्षेत्रात ज्याप्रकारे विकास झाला,दुर्देवाने तसा तो या ऐतिहासिक नगरीचा झाला नाही.गेल्या वीस वर्षांपासून विकासाचे प्रश्न अनेक प्रलंबित आहेत.ते मार्गी लावण्यासाठी ही महानगरपालिका आपल्याला जिंकावी लागणार आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने आपण विजय मिळवला,तसाच विजय महानगरपालिका निवडणुकीत मिळवायचा आहे.त्यासाठी कामाला लागा.महानगरपालिका तुम्ही जिंकलीत की आम्ही विकासाचे कसे परिवर्तन घडवतो ते पहा.त्यासाठी कामाला लागा.तुमची स्वप्ने साकार व्हावीत,यासाठी महानगरपालिका आपल्याला जिंकावीच लागेल.त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.भरपावसात हा कार्यक्रम पार पडला.यावेळी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालकमंत्री गणेश नाईक,कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,आ.राजेंद्र गावित,आ.स्नेहा दुबे,आ. राजन नाईक,वसई विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील,माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

