सुनंदन गोखले,नाशिक रोड
नाशिक महानगरपालिका निवडणूक ; प्रभाग रचनेच्या कामावर राजकीय पक्षाचा दबाव असण्याची शक्यता,
केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालीना वेग आला आहे. नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू तापू लागले आहे.नाशिकच्या महायुतीमध्ये अंतर्गत बऱ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत.तर महाविकास आघाडीची घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
महापालिकेची प्रभागरचना आपल्याला अनुकूल असावी, यासाठी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व भाजप या दोघांकडून छुपे प्रयत्न सुरू झाले आहेत.प्रभागरचना जर अनुकूल असेल तर महानगरपालिकेत आपला विजय सोपा असेल,अशा निर्णयाप्रत हे दोन्ही पक्ष आले आहेत.त्यामुळे प्रशासनाने कितीही निरपेक्षपणे काम करण्याचा प्रयत्न केला तरी प्रभाग रचनेवर अप्रत्यक्षरीत्या राजकीय दबाव हा असणारच. राज्यात महायुतीची सत्ता असली तरी भाजपला नाशिकची सत्ता पुन्हा एकहाती हवी आहे.त्यादृष्टीने भाजपकडून व्यूहरचना करण्यात येत आहे.तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही याविषयी रणनिती आखण्यात येत आहे.त्यामुळे या दोन प्रमुख पक्षात कुरघोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीसाठी ११ ते १६ जून दरम्यान प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे.त्यासाठी प्रगणक गट नियुक्त करण्यात येणार आहेत.त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
२२ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २५ दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मात्र,प्रशासकीय तयारी सोबत राजकीय पक्षांनीही आपापसात लढाईची तयारी केली आहे.२०१७ मध्ये राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार असताना भाजपाने चार सदस्यीय प्रभाग रचना केली होती.त्याचा फायदा भाजपाला झाला होता आणि त्यांचे ६६ नगरसेवक निवडून आले होते.तर शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते.त्यामुळेच २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भाजप सरकारची राज्यातील प्रभाग रचना रद्द केली होती.
आता तीन वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेची मुदत संपल्यानंतर नव्याने प्रभाग रचना तयार करण्यात येणार होती.त्यावेळी आधी दोन आणि नंतर तीन सदस्यीय प्रभाग रचना करताना महापालिकेतील अनेक बाहुबली नगरसेवक तसेच काही राजकीय नेत्यांनी आपल्या सोयीची प्रभाग रचना तयार केल्याचा आरोप झाला होता.
आपल्या पॅनलचे आणि सोयीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रभाग रचनेत त्यावेळी मोठ्याप्रमाणात बदल करण्यात आले होते.
यंदा मात्र,राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे तशाच प्रकारचा दबाव प्रशासनावर राहण्याची शक्यता आहे.एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे नगरविकास खात्याची सूत्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत.त्यामुळे प्रभाग रचनेवर प्रभाव कोणाचा असेल ? यासंदर्भात सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

