नदीम शेख,पालघर
प्रशासनाच्या
हलगर्जीपणामुळे लोकमान्य नगर,मोहपाडा येथील नागरिक त्रस्त,
पालघर नगरपरिषद हद्दीतील लोकमान्य नगर परिसरातील मोहपाडा रोड,मुख्य रस्ता,सध्या खोदलेला असून तो अनेक दिवसांपासून तसाच अर्धवट अवस्थेत सोडण्यात आला आहे.त्यामुळे या भागातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरून रुग्णवाहिका,अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन वाहने येऊ-जाऊ शकत नाहीत.अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना किंवा वैद्यकीय गरज उद्भवली,तर मदत पोहोचवणं कठीण होते. विशेष म्हणजे,या रस्त्याच्या लागून दोन शाळा आहेत.लहान मुलांना दररोज याच मार्गाने शाळेत ये-जा करावी लागते. स्थानिक नागरिक,दुकानदार आणि वयोवृद्धांना देखील प्रवास करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.काहींनी पर्यायी मार्ग वापरण्याचा प्रयत्न केला,पण तोही पुरेसा सुरक्षित नाही.
प्रशासनाने याप्रकरणी तातडीने लक्ष घालुन रस्त्याचं काम पूर्ण करून वाहतुकीस खुला मार्ग द्यावा,अशी मागणी लोकमान्य नगर व मोहपाडा येथील नागरिक करत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पोपट चव्हाण यांनी सांगितले की सर्विस रोड रुंदीकरण करून त्याच्या बाजूला गटार बांधू तसेच यासंदर्भात एक-दोन दिवसांमध्ये प्रशासकीय अधिकारी तसेच स्थानिक रहिवासी यांची बैठक घेऊन पुढील नियोजन कसे करता येईल,यावर विचार करु.
यावेळी स्थानिक रहिवासी अजित भुवड,चेतन घोडके, डॉ.श्रीकांत बुद्धे,संजय चौधरी, संदीप कदम,डॉ.चेतन शिंदे, नवनाथ चव्हाण तसेच लोकमान्यनगर व मोहपाडा येथील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

