सचिन पाटील,विरार
गणेशोत्सव संदर्भात मुर्तीकारांसोबत महानगरपालिका प्रशासनाची बैठक संपन्न,
आयुक्त तथा प्रशासकअनिलकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांचेसोबत गणेशोत्सव संदर्भात बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरुवातीस उपायुक्त अर्चना दिवे यांनी महानगरपालिकेने गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी,गणेशमूर्ती विसर्जनासाठी केलेल्या नियोजनाची तसेच एकूण झालेल्या विसर्जनाबाबतची माहिती उपस्थितांना देण्यात आली.आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने एकूण १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती.गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२४ मध्ये गणेशोत्सव काळात महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३३ हजार ७०१ मूर्तींचे विसर्जन झाले होते,त्यापैकी एकूण १९ हजार ८५३ मूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेने निर्मिती केलेल्या कृत्रिम तलाव,फिरते हौद यांमध्ये झाल्याची माहिती यावेळी उपायुक्त अर्चना दिवे यांनी दिली.
वसई विरार शहर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा उपक्रम यशस्वीरीत्या राबवला आहे. यावर्षीही सर्व नागरिकांच्या सहकार्याने महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्या कामी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.वसई विरार शहर हे तलावांचे शहर असून पीओपीच्या मूर्ती,अशा नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करून तलाव दुषित न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.नागरिकांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती जास्तीत जास्त प्रमाणात आणाव्यात. त्याचप्रमाणे मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी,थर्मोकोलचा उत्सवात कमी वापर करण्याचे तसेच गणेशोत्सव मंडळांनीही आवश्यक त्या सर्व परवानग्या घेवूनच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आयुक्त अनिलकुमार पवार यांनी गेल्या गणेशोत्सव काळात नागरिकांनी महानगरपालिका निर्मित कृत्रिम तलावांत जास्तीत जास्त गणेशमूर्तींचे विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला होता. महानगरपालिकेच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिक, पदाधिकारी,गणेशोत्सव मंडळे,संस्था व पत्रकारांचे प्रशासनाने आभार मानले.या बैठकीत उच्च न्यायालयाने दिलेल्या पीओपी निर्देशांबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्या साठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे सर्वांनी योग्यरित्या पालन करावे.यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांत जास्तीत जास्त गणेशमूर्तींचे विसर्जन करून महापालिकेला सहकार्य करावे. महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांच्या जागांव्यतिरिक्त इतर आवश्यक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यासाठी नागरिक,पदाधिकारी यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणीही पाहणी करून कृत्रिम तलाव उभारण्याची व्यवस्था करण्यात येईल. जास्तीत जास्त शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे,यासाठी महापालिकेतर्फे मूर्तीकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे बाबत महापालिका प्रयत्नशील आहे. महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सव मंडळांसाठी दरवर्षीप्रमाणे महानगरपालिका,पोलीस विभाग,महावितरण यांची एकाच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने निशुल्क परवानग्या देण्यास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक त्या परवानगी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा.मंडपामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही,याची दक्षता घ्यावी,मंडपाच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची योग्य ती व्यवस्था मंडळांनी करावी.मंडपात विद्युत कनेक्शन घेते वेळी महावितरणाच्या सूचनेनुसार ती घ्यावी.मिरवणुकीच्या वेळी उंचीमुळे उच्च दाबाच्या वाहिनीला धक्का लागून अपघात होऊ नये,याबाबतची दक्षता मंडळातर्फे घेण्यात यावी.यासाठी कमी उंचीच्या गणेशमूर्ती आणण्याला मंडळांनी प्राधान्य द्यावे,असे आवाहन यावेळी आयुक्तानी केले.
या बैठकीस उपस्थित मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व महानगरपलिका अधिकारी यांच्यामध्ये गणेशोत्सवा संदर्भात विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.उपस्थित मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांनी विविध सूचना यावेळी केल्या.या सूचनांवर विचारविनिमय करून आवश्यक तेथे लवकरच उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला प्रभाग सहाय्यक आयुक्त महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी,महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी इ.उपस्थित होते.सदर बैठकीचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी केले.

