जव्हार प्रतिनिधी,
भगवान बिरसा मुंडा बलिदान दिवस व छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
गेल्या नऊ वर्षात आदिवासी समाजातील तळागाळातील समाज बांधवांना जागृत करून पारंपारिक संस्कृती टिकवण्याचे प्रामाणिक कार्य करत असलेल्या जनजाती विकास मंचाचे काम हे प्रेरणादायी असून सध्याच्या आधुनिक युगात समाजाला याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल,असे गौरवोउद्गार पालघर लोकसभेचे खा. डॉ.हेमंत सवरा यांनी काढले.
जनजाती विकास विकास मंच आयोजित भगवान बिरसा मुंडा बलिदान दिवस व छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने जव्हार येथे सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आदिवासी समाजाचे दैवत मानल्या जाणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जव्हारच्या प्रगती प्रतिष्ठान येथे जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजाती विकास मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेकडो आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमात जनजाती विकास मंचाचे प्रास्ताविक करताना कार्याध्यक्ष संदीप कनोजा यांनी मागील नऊ वर्षातील जनजाती विकास मंचाच्या कार्याची विस्तृत माहिती दिली.समाजातील विविध घटकापर्यंत पोहोचून आदिवासी समाजाला जागृत करण्याचे काम मंच करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आदिवासी समाजाच्या रूढी,परंपरा,संस्कृतीचे जतन करण्यासाठी जनजाती विकास मंच काम करीत असून यापुढेही अखंडपणे कार्य चालूच राहणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
आदिवासी समाजातील स्वतंत्र लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या व सहभागी होणाऱ्या क्रांतिकारकांच्या यादीचे वाचन करून वकील यशवंत कोदे यांनी आजपर्यंत प्रकाशात न आलेल्या आदिवासी समाजातील क्रांतिकारकांची देशासाठी व समाजासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती देऊन स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पालघर जिल्ह्यात सात सत्याग्रह झाल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात करतांना प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून समाजातील विविध क्षेत्रात पारंगत असलेल्या व आदिवासी समाजासाठी योगदान देणाऱ्या सत्कारमूर्तींचाही सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या शरद शेळके यांनी आदिवासी क्रांतिकारकानी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व विशद करून भगवान बिरसा मुंडा यांचा लखलखता इतिहास श्रोत्यांसमोर मांडला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देऊन छत्रपती शिवरायांनी एकही लढाई न गमावता राज्यकारभार चालवला असल्याचे त्यांनी सांगितले.
पालघर लोकसभेचे खा.डॉ.हेमंत सवरा व विक्रमगड विधानसभेचे आ.हरिश्चंद्र भोये यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले.
आ.भोये यांनी आपल्या मनोगतामध्ये आदिवासी समाजाचे महत्त्व सांगून राज्य सरकारने नुकत्याच अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केल्यामुळे राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले. खा.डॉ.सवरा यांनी आपल्या भाषणात जनजाती विकास मंच करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.आदिवासी समाजातील विविध क्रांतिकारकांचा इतिहास सांगून समाज साजरा करीत असलेल्या पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब न करता समाजातील पारंपारिक संस्कृतीचे जतन करून आदिवासी संस्कृती टिकावी या दृष्टीने सण-उत्सव साजरे करावेत,असे सांगितले.

