वाडा प्रतिनिधी,
वाड्यात निवडणूक आयोगा विरोधात मशाल मोर्चा,
देशातील निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडणे, हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे.लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे,परंतु मागील निवडणुकीतील काही घटना पाहता या स्वायत्त संस्थेवरील जनतेचा व राजकीय पक्षांचा विश्वास कुठेतरी कमी होत असल्याचे दिसत आहे. त्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हें. २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अनेक गैरप्रकार दिसून आले आहेत. असे मत काँग्रेस कमिटीचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी मांडले आहे.ते पत्रकारांशी बोलत होते.
वाडा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत,ते पुढे म्हणाले की,मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करणे व वगळणे या प्रक्रियेत मोठा गोंधळ व घोटाळा झाल्याच्या तक्रारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर मतदानाच्या टक्केवारीतही मोठी तफावत दिसून आली आहे.निवडणूक आयोगाकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात सविस्तर आकडेवारी व पुराव्यासह तक्रार करून चौकशी करण्याची व काही महत्वाची कागदपत्रे,मतदार याद्या, मतदानाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज मागितले होते.पण निवडणूक आयोगाने ते अद्याप दिले नाहीत,म्हणून निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभारा विरोधात पालघर येथे १६ जून रोजी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
याप्रसंगी वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील,ल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

