सचिन परब,वसई
तब्बल एक दशकानंतर वसईची आमसभा संपन्न,
वसई तालुक्यात २०१४ नंतर प्रथमच वसई पंचायत समितीची आमसभा उत्साहात पार पडली.
वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा आयोजित करण्यात आली होती.
सहा महिन्यापूर्वी वसईत नेतृत्व बदल झाल्यावर तथा एका दशकाच्या कालावधीनंतर पहिल्यादाच झालेल्या या आमसभेला ३१ ग्रामपंचायतीचे सरपंच,पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी , गावकरी सर्व शासकीय विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी स्थित होते.

विशेष म्हणजे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आ.स्नेहा यांची ही पहिलीच आमसभा होती.या आमसभेच्या अध्यक्षा तथा आ.स्नेहा दुबे पंडित यांनी वसईत कार्यरत विविध शासकीय विभागांचा आमसभेत सविस्तर आढावा घेतला आणि वसईच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही शक्य होईल,ते करण्याचे स्पष्ट केले.
या आमसभेत जनतेकडून आलेले प्रश्न,सूचना व समस्याचे निराकरण करण्यात आले.तसेच प्रमुख विभागांचा आढावा घेण्यात आला.यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,वसई विभाग,एस.टी. आगार व्यवस्थापन,वसई, तहसिलदार कार्यालयदर निरीक्षक,वसई,आरोग्य, शिक्षण विभाग,पंचायत समिती तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आदी विभागाचा समावेश होता.
या बैठकीमध्ये पायाभूत सुविधा,आरोग्य,शिक्षण, जलव्यवस्थापन आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी,यावर सखोल चर्चा करण्यात आली.
वसईच्या विकासाचा दृढ संकल्प,या आमसभेद्वारे अधोरेखित झाला असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासन प्रशासन एकत्र येऊन कार्यरत राहील, असा विश्वास आ.स्नेहा दुबे पंडित यांनी व्यक्त केला.या आमसभेस सचिव तथा गटविकास अधिकारी वसई,प्रदीप डोलारे,नायब तहसीलदार शशिकांत नाचन,विविध शासकीय विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच-उपसरपंच,मंडळ अध्यक्ष,पक्षांचे पदाधिकारी, वसईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

