सुरेश वैद्य,पालघर
पालघर जिल्ह्याची मान्सूनपूर्व आरोग्य तयारी पूर्ण, आरोग्य विभाग सज्ज,
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथीच्या आजारांवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषद पालघर आरोग्य विभागाने मान्सूनपूर्व कृती आराखडा २०२५-२६ जाहीर केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार परिषदेत या आराखड्याची सविस्तर माहिती देण्यात आली.
डेंग्यू,मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, हिपॅटायटीस,गॅस्ट्रो आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांचे वेळीच निदान आणि उपचारासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यरत असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरोदर माता, स्तनदा माता आणि पाच वर्ष वयाच्या बालकांसाठी २४ तास संदर्भ सेवा उपलब्ध आहे.
याशिवाय,गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्यासाठी स्वतंत्र संदर्भ सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १०२ तर ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांसाठी १०८ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.यासाठी सर्व केंद्रांना थेट संपर्कासाठी दूरध्वनी आणि जिल्हास्तरीय स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत डेंग्यू, मलेरिया आणि जलजन्य आजारांवरील औषधे,चाचणी किट्स आणि प्रतिबंधक साधनसामग्रीचा पुरेसा साठा करण्यात आला आहे.तापाचे नमुने तपासण्यासाठी आवश्यक किट्सही उपलब्ध आहेत.साचलेले पाणी हटवणे,डासांचे निर्मूलन, टाक्या स्वच्छ करणे आणि विहिरी व जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायती आणि नगरपरिषदातर्फे विशेष मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका,शिक्षक,स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना साथीच्या आजारांच्या नियंत्रणासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. रेडिओ,बॅनर,पोस्टर,सोशल मीडिया आणि मोबाइलद्वारे व्यापक जनजागृती केली जाणार आहे.तालुका आणि जिल्हा पातळीवर नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून, आवश्यकतेनुसार वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेवक, परिचारिका आणि औषध वितरण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पत्रकारांना दिली.
डॉ.संतोष चौधरी यांनी नागरिकांना आवाहन केले की, ” पावसाळ्यात आरोग्याशी संबंधित कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.संदर्भ सेवा, १०८/१०२ रुग्णवाहिका आणि नियंत्रण कक्षांचा पुरेपूर लाभ घ्यावा.” पालघर जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या या सर्वंकष तयारीमुळे पावसाळ्यातील आरोग्य आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले.

