सफाळे प्रतिनिधी,
सफाळ्यात महावितरणचा भोंगळ कारभार,ग्रामस्थ त्रस्त,
महावितरणच्या सफाळे विभागात गेल्या काही दिवसापासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहॆ. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.दोन दिवसापूर्वी पालघर बिडको भागात ३३ के.व्ही.लाईन जळाल्यामुळे रात्री साडेसातच्या सुमारास सफाळे आणि आसपासच्या परिसरात खंडीत झाला.तो वीजपुरवठा तब्बल १५ तासानंतर सुरळीत झाला. सफाळे पूर्व आणि पश्चिम भागातील विविध गावापाड्यात गेल्या काही दिवसापासून सतत वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे नोकरदारवर्ग, विद्यार्थी,व्यापारी यांच्यासह बँका तसेच विविध ऑनलाईन व्यवहाराला फटका बसला आहे.महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे.
सफाळे पूर्व-पश्चिम भागात अनेक गावे असून शेती वाड्या,दुग्ध व्यवसाय,करत असतात.
यंदा मेच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढीला लागल्या आहेत. पावसापूर्वीच्या दुरुस्तीच्या कामात महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे पाऊस अगर वेगाने वारे वाहू लागल्यास त्वरित वीजपुरवठा खंडित होत आहे.रात्री- अपरात्री तसेच दिवसाही वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.महावितरण विभागाने याप्रकरणी वेळीच योग्य ती कार्यवाही न केल्यास सफाळ्यात आंदोलन होण्याची शक्यता आहॆ.

