संजय नेवे,विक्रमगड
विक्रमगड तालुक्यातील टेटवाली गावाला पालकमंत्र्यांची भेट,
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड तालुक्यातील नुकसानग्रस्त टेटवाली गावाची काल पाहणी दौरा केला.यावेळी नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबाला नुकसान भरपाई तत्काळ मिळेल,असे वाटत होते,परंतु नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे बाधित कुटुंबे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकसानग्रस्तांना सीएसआर फंडातून तातडीची मदत व अन्न धान्य देण्याचे आश्वासन दिले होते.
गेल्या आठवड्यात विक्रमगड तालुक्यातील टेटवालीसह नऊ गावाचे वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान केले होते.अनेक घरावरील छप्परे,कौले व पत्रे उडाले होते,तर काही घरांच्या भिंती पडल्या होत्या.या घटनेत दहा ग्रामस्थ जख्मी झाले होते. तर वीज कोसळून शेतकऱ्यांचे दोन बैलही मृत्युमुखी पडले होते.
वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या घरासहित संसार उपयोगी साहित्याचे नुकसान होऊन नागरिकापुढे निवारा व उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली होती.
पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी टेटवाली गावांतील नुकसानग्रस्त घरांची पहाणी करून नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या.त्यांनी यावेळी शासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल,पण तत्पूर्वी नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने अन्नधान्य व सीएसआर फंडातून शक्य ती मदत लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले.

