दीपक मोहिते,
पालघर जिल्ह्याच्या जलजीवन मिशन योजनेची केंद्रीय सचिवांनी केली पाहणी,
भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे सचिव अशोक कुमार के.मिना यांनी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ५८ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलj जीवन मिशन योजनेच्या जलस्त्रोत आणि पाणी शुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली.या भेटीदरम्यान त्यांनी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि स्थानिक स्तरावरील अंमलबजावणीचे मूल्यमापन केले.यावेळी त्यांच्या सोबत राज्य पाणी व स्वच्छता विभागाचे अभियान संचालक ई.रविंद्रन, पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड,मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,जव्हारच्या प्रकल्प अधिकारी अपूर्वा बसुर, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश पाध्ये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय मुळे,मोखाडा गटविकास अधिकारी अक्षय पगार, मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप वाघ, तसेच राज्य आणि जिल्हा स्तरावरील विविध अधिकारी, कर्मचारी आणि सल्लागार उपस्थित होते.
याशिवाय ग्रामपंचायत सरपंच,n सदस्य,गावकरी,महिला बचत गटाच्या सदस्या,आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय सचिवानी वाकडपाडा आणि किनिस्ते या गावांतील जल जीवन मिशन योजनेच्या कामाची पाहणी केली.वाकडपाडा येथील कातकरी वाडीला भेट देऊन त्यांनी नळ जोडणी मिळालेल्या कुटुंबांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत शौचालयाची उपलब्धता,कचरा वर्गीकरण आणि गावातील स्वच्छतेची स्थिती याबाबत विचारणा केली.किनिस्ते गावात पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करणाऱ्या पाच महिला जल सुरक्षकांनी पाण्याच्या नमुन्यांचे प्रात्यक्षिक दाखवले, ज्यामुळे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे प्रत्यय सचिवांना आला.
जल जीवन मिशन अंतर्गत मोखाडा तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये सुरक्षित आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या भेटीमुळे योजनेच्या स्थानिक अंमलबजावणीला आणखी बळकटी मिळेल आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल.असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

