दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महामार्गावर पोलिसांची खंडणी वसुली जोरात,
मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग,हा दिवसेंदिवस प्रवाश्यासाठी त्रासदायक ठरु लागला आहे.वाहतूककोंडी,धुळीचे साम्राज्य,अर्धवट अवस्थेत असलेली दुरुस्तीची कामे,इ.गैरप्रकारामुळे मुंबई व गुजरात दिशेने दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.या महामार्गावर गेल्या पाच वर्षात झालेले अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या लक्षात घेता,हा महामार्ग कसा धोकादायक बनला आहे,हे दिसून येते.नागरिक,या सर्व अग्निदिव्यातून जात असताना आता वाहनचालकांना वेगळ्याच समस्याना सामोरे जावे लागत आहे.या महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांकडून महामार्ग पोलिसांनी वाहनांची कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली सर्रास खंडणी वसुली सुरू केली आहे.
महामार्गावरील वाहतुककोंडी,अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी महामार्ग पोलिसांनी अनेक ठिकाणी खंडणी वसुली केंद्रे सुरू केली आहेत.अवजड वाहने,प्रवासी वाहतूक करणारे काळी-पिवळी वाहने,रेती व मातीची वाहतूक करणाऱ्या डंपरचे वाहनचालक यांना हे पोलीस टार्गेट करत असतात.दिवसाकाठी लाखो रु.ची वसुली होत असते.या महामार्गावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त असताना,आता पोलिसांच्या या खंडणी वसुली सत्राने हवालदिल झाले आहेत.या व्यतिरिक्त काही पोलीस ठाण्याचे पोलीस देखील कोणतेही अधिकार नसताना ते ही अधून मधून वसुली करताना पाहायला मिळतात.वास्तविक या महामार्गांवरून दररोज लाखो रु. चा गुटखा,बनावट विदेशी दारू व काळ्या गुळाची प्रचंड वाहतूक होत असते.ही वाहतूक करणारी वाहने अहोरात्र ये-जा करत असतात.पण त्या वाहनाची कधीही तपासणी केली जात नाही.त्यामुळे पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक व मीरा-भाईंदर/वसई विरार आयुक्तालयाच्या आयुक्तांनी या गैरप्रकारावर कारवाई करावी,अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

