दीपक मोहिते,
पालघर जिल्ह्याचा गौरव ; दोन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार,
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ” यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५,” अंतर्गत आयोजित उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था,गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी गौरव पुरस्कार सोहळा आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथे पार पडला.
या कार्यक्रमाला महामहीम राज्यपाल पी.सी.राधाकृष्णन उपस्थित होते.तसेच ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग मंत्री जयकुमार गोरे व गृहराज्यमंत्री ( शहरे ), योगेश कदम हे देखील या सोहोळ्यास आवर्जून उपस्थित होते.
सन २०२२-२३ साठी नितीन देऊ पवार,ग्रामपंचायत अधिकारी,मनोर ( ता.पालघर ) आणि सन २०२३-२४ करीता दिपक पांडुरंग पाटील,ग्रामपंचायत अधिकारी,गोऱ्हे ( ता. वाडा ) यांना हा गौरव प्राप्त झाला आहे.
या सोहोळ्यात पालघर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला.
यावेळी पालघर जिल्हा परिषदेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,
प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत (साप्रवि), चंद्रशेखर जगताप (ग्रा. पं) उपस्थित होते.
ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी जिल्हास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात येत असतो.हे अधिकारी आपल्या कर्तव्यनिष्ठेने ग्रामपंचायत व्यवस्थापनात भरीव कामगिरी बजावत असून इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
या कार्यक्रमात बोलताना महामहीम राज्यपाल राधाकृष्णन आपल्या भाषणात म्हणाले, “आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी डिजीटल सेवा,ऑनलाईन पोर्टल्स आणि संगणकीय प्रणाली यांचा उपयोग करणे, ही काळाची गरज आहे.”
ते पुढे म्हणाले, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपत्ती निर्माण करून ती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा दृष्टिकोन आहे.हेच गरिबी दूर करण्याचे खरे साधन आहे.”
पालघर जिल्ह्यातून एकाच वेळी दोन अधिकाऱ्यांना सलग दोन वर्षे पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण जिल्ह्याचा सन्मान वाढला असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

