वसंत भोईर,वाडा
स्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप,
वाडा तालुक्यातील पालसई जिल्हा परिषद गटातील नविन रस्ते बांधणीच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधी,सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार व वाडा यांना निवेदन देऊन निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वाडा तालुक्यातील पालसई जिल्हा परिषद गटातील दहा ग्रामपंचात हद्दीतील गोरगरीब आदिवासी नागरीक राहत असलेल्या गावपाड्यांना व वस्त्यांना जोडण्यासाठी ६० रस्ते मंजुर झाले असून त्याची कामे देखील सुरु झाली आहेत.या रस्त्यांची ग्रामस्थांनी पाहणी केली असता अंदाज पत्रकानुसार कामे होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.सबंधित ठेकेदाराने रस्ते माती भराव न करता रेत व खडी टाकून डांबर टाकण्यात आले आहे.त्यामुळे हे रस्ते मजबुत व टिकाऊ होणार नाहीत.तसेच रस्त्याची रुंदीही कमी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याबबत संबंधिक अधिकाऱ्यांना विचारले असता,उडवाउडवीची उत्तरे मिळतात.प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी,बोलावले असता येत नाहीत.असा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे.तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांची बिले देण्यास हरकत घेतली आहे.
अतिदुर्गम भागात स्वातंत्र्यानंतर प्रथमच गाव-वस्त्या जोडण्यासाठी हे डांबरी रस्ते तयार करण्यात आले आहेत.त्यामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. या भ्रष्टाचारामध्ये सामील असलेले ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सदर निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खा.डाॅ.हेमंत सवरा,मुख्य कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग जव्हार,सा.बां. उपविभाग कार्यकारी अधिकारी वाडा यांना देण्यात आले असून या निवेदनावर भाजपा जिल्हाउपाध्यक्ष कृष्णा भोईर,केशव पाटील,राजू दळवी,माजी सभापती अरुण गौंड,यांच्या स्वाक्ष-या आहेत.
अतिदुर्गम भागातील अंबरभुई दांडेकरपाडा, अंबरभुई जाधव पाडा, अंबरभुई डवलेपाडा, गायगोठा अंतर्गत रस्ता, गायगोठा मागीपाडा, कोशिमशेत अंतर्गत रस्ता हे रस्ते अंदाज पत्रकानुसार केले नसुन प्रत्येक रस्त्याची लांबी व रुंदी कमी आहे.नविन रस्ते करीत असताना सरसकट खडी टाकुन त्यावर डांबर टाकण्यात आले आहे.त्यामुळे हे रस्ते मजबुत व टीकाऊ होणार नाहीत. या अतिदुर्गम भागात स्वातंत्र्यानंतर प्रथमच गाव- पाड्यांवर हे डांबरी रस्ते आले आहेत.त्यात सुध्दा ठेकेदारांनी भ्रष्टाचार करण्याचे काम चालवले आहे.यांची चौकशी करुन आम्हाला चांगल्या दर्जाचे रस्ते बनवुन द्यावेत.अन्यथा आम्ही या विरुध्द तीव्र आंदोलन करु असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

