वसंत भोईर,वाडा
उन्हातान्हात किती काळ ठिगळं लावत बसायचे ?
चर्मकार समुदायातील रस्त्याच्या कडेला असलेल्या मोचींसाठी गटई स्टॉल योजना राबवण्यात येत असते. या योजनेत टिन स्टॉलच्या उभारणीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.परंतु माहितीच्या अभावी अनेक जण या योजनेपासून वंचित आहेत.अजूनही साधा कपडा टाकून किंवा हातगाडीवर उन्हातान्हात चप्पल शिवण्याचे काम करणारे चर्मकार समाजबांधव प्रत्येक चौकात हमखास पाहायला मिळतात. या योजनेची माहिती नसल्याने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.या चर्मकार बांधवांनी उन्हातानात किती दिवस ठिघळं लावायची ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील( चर्मकार,मोची) आदी व्यक्तींना त्याचे जीवनमान उंचावणे,समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळावे व त्यांचा शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक विकास होण्यासाठी समाज कल्याण विभाग आणि महामंडळामार्फत गटई स्टॉल योजना राबवते.यामध्ये शंभर टक्के अनुदानावर टिन पत्र्याचा स्टॉल दिला जातो.
रस्त्यावर उघड्यावर पादत्राणे दुरुस्त करण्याचा व्यवसाय करणाऱ्या या लोकांना गटई स्टॉल योजनेचा लाभ मिळणार का ? या लोकांना योजनेची माहिती नसेल तर त्याबाबत विभागातर्फे जनजागृती केली जाणार का ? या योजनेची खरंच अंमलबजावणी करायची असेल तर या समाजामध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.
गेल्या वीस वर्षापासून चप्पल व जोडे शिवण्याचे काम करत आहे.मात्र आजपर्यंत शासनाकडून कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही. एकाही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कधी विचारपूस केली नाही.
– संजय भोईर,चर्मकार

