दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आयुक्ताच्या बॉडीगार्डची दहशत ; उर्मट बॉडीगार्डवर कारवाई करण्याची मागणी,
वसई विरार शहर महानगरपालिकेत सध्या कायद्याचे राज्य राहिले नसून पोलीसराज निर्माण झाले आहे.काल एक आंदोलक महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना आयुक्तांच्या बॉडीगार्डने त्याला धक्काबुक्की करत आंदोलन बंद करायला लावले.त्यानंतर त्या आंदोलकाने आक्रमक पवित्रा घेत,त्या पोलिसाला खडे बोल सुनावले.त्या तरुणांच्या आक्रमक पवित्र्याने त्या बॉडीगार्डची बोबडी वळली व तो कॅमेऱ्यापासून सतत पळ काढताना दिसला.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर एका तरुणाने आयुक्तांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात बॅनर्स लावले व तो प्रवेशद्वारानजीक धरणे आंदोलनास बसला.त्याच सुमारास आयुक्तांचा बॉडीगार्ड आर.डी.मेश्राम हा घटनास्थळी आला आणि त्याने सदर तरुणास धक्काबुक्की करत आंदोलन बंद करायला लावले.तसेच तेथे उपस्थित असलेल्या अन्य पोलिसांनी त्याला मुख्यालयात प्रवेश करण्यापासून रोखले.त्यामुळे संतापलेल्या त्या तरुणाने पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले.वास्तविक आंदोलकाला धक्काबुक्की करणे,बॅनर्स काढणे व आंदोलन बंद करायला लावणे,ही बॉडीगार्डची कामे नसताना त्याने आपल्या मर्यादा ओलांडल्या,त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी त्या तरुणाने केली आहे.राज्यभरात वसई विरार शहर महानगरपालिकेची ओळख बदनाम महानगरपालिका अशी बनली आहे.खंडणी, वसुली,अनधिकृत बांधकामे व बोगस सीसी,ना हरकत दाखला,या सर्व प्रकरणी ही महानगरपालिका बदनाम झाली आहे.गेल्या चार वर्षात अनेक अधिकाऱ्यांनी येथील जनतेची कोट्यवधी रु.ची लूट केली.अनेक वरिष्ठ अधिकारी सध्या ईडीच्या रडारवर आहेत.अशा परिस्थितीत पोलीस देखील गुंडगिरी करू लागल्यामुळे भविष्यात सर्वसाधारण नागरिक देखील या महानगरपालिका मुख्यालयात धजावणार नाहीत.या उर्मट पोलिसांवर पोलिस आयुक्तांनी कारवाई करावी,यासाठी काही सामाजिक संस्थांचे शिष्टमंडळ मीरा-भाईंदर,विरार व पोलीस आयुक्तालयाच्या आयुक्तांची भेट घेणार आहेत.

