वसंत भोईर,वाडा
वनशक्ती संस्थेच्या उन्हाळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद,निसर्गाशी जोडणारा उपक्रम संपन्न,
वनशक्ती संस्थेमार्फत दिनांक १६ ते २० मे २०२५ या कालावधीत ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी पाच दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात एकूण ४२ विद्यार्थी सहभगी झाले होते. विद्यार्थ्यांसह पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी,हे शिबिराचे मुख्य उद्दिष्ट होते.
या शिबिरात मुलांनी भाजीपाला शेतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. नैसर्गिक साहित्याचा वापर करून हस्तकला तयार करणे, सकाळी ध्यानधारणा करणे व पक्षीनाद निरीक्षण,नदी परिसंस्थेचा अभ्यास, जलशुद्धीकरणाच्या नैसर्गिक पद्धती,वनस्पती व कीटक निरीक्षण,तसेच स्थानिक रोपवाटिकेला भेट देणे,असे अनेक उपक्रम राबवण्यात आले.रोपवाटिकेत कंपोस्ट निर्मिती, रोपांची लागवड व कुंडी सजावटीचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.
कॅम्पच्या चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांना डोंगर व तलाव परिसरात निसर्गभ्रमंती घडवण्यात आली. या भ्रमंतीदरम्यान विद्यार्थ्यांनी साग,पळस,कोशिंबे,आळवे, यासारख्या झाडांचे निरीक्षण केले. तसेच कोकीळ, किंगफिशर,बुलबुल व कोतवाल यांसारख्या पक्ष्यांचे आवाज ओळखण्याचा प्रयत्न केला.जलस्रोतांचे महत्त्व समजून घेत,त्यांनी गोळा केलेल्या बियांपासून डोंगरावर वृक्षारोपणही केले.
शिबिराच्या अंतिम दिवशी शंख,शिंपले,दगडांवर चित्रकला आदी हस्तकला सत्र आयोजित करण्यात आले. त्यानंतर विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.समारोपप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र व बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
निसर्गभ्रमंतीचे मार्गदर्शन वनशक्तीचे प्रकल्प अधिकारी निशांत पाटील आणि योगिता कासार यांनी केले.
वनशक्ती संस्था अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, सर्जनशीलता,सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे आणि भविष्यातही असे उपक्रम राबवणार आहेत.

