दीपक मोहिते,
ग्रामीण भागात मान्सूनच्या तोंडावर घराची दुरुस्ती व डागडुजीला सुरुवात…
नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील जनतेची पार दाणादाण उडवून दिली आहे.परवा रात्री झालेली अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात सुमारे शंभरहून अधिक घरांची पडझड झाली.या बाधित घरांची महसूल विभागाकडून सध्या पाहणी करण्यात येत असून या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला पाठवण्यात येणार आहे.
मात्र अचानक कोसळलेल्या या संकटामुळे स्थानिक भूमिपुत्र मात्र कोलमडून पडला आहे.जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होत असते.परंतु यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मे महिन्यातच अतिवृष्टीला सामोरे जावे लागले.अवकाळी पाऊस जर इतका धुवांधार पडतो तर यंदाचा पावसाळा हा अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता गृहीत धरून ग्रामस्थ आतापासूनच कामाला लागले आहेत.घरावरील कौले बदलणे,अन्नधान्याचा साठा सुरक्षित ठिकाणी करणे,शेतीच्या अवजारांची दुरुस्ती व डागडुजी इ.कामांना सुरुवात करण्यात आली आहे.दरम्यान शासनाने दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने ज्या घरांचे नुकसान झाले आहे,त्या रहिवाशांना सरकारने तातडीने पत्रे,शेड्स व कौले द्यावीत,अशी मागणी करण्यात येत आहे.

