जव्हार प्रतिनिधी,
जव्हार बँकेचा ” सॅफ,” ला बाय बाय…
दहा वर्षांपूर्वी अनियंत्रित कर्जांमुळे ( एन.पी.ए. ) आर्थिक अडचणीत सापडलेल्या जव्हार अर्बन बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१४ मध्ये ‘सॅफ’ ( सुपरवायजरी ॲक्शन फ्रेमवर्क ) अंतर्गत वर्गीकृत केले होते.त्यामुळे बँकेवर अनेक निर्बंध लादलण्यात आले होते.विद्यमान संचालक मंडळाने प्रशासकीय यंत्रणेत आमूलाग्र बदल करून नवीन व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली.त्यांच्या या प्रयत्नांमुळे अल्पावधीत बँकेचा एन.पी.ए. ३६ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आले.त्यामुळे बँकेचा नफा वाढला व बँकेच्या आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा झाली.
गेल्या आर्थिक वर्षात बँकेने ‘अ’ श्रेणीचे ऑडिट रेटिंग प्राप्त केले.बँकेच्या विद्यमान संचालक मंडळ आणि प्रशासनाने केवळ दोन वर्षांत केलेल्या या प्रभावी कामगिरीची दखल घेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जव्हार अर्बन बँकेला दशकभराच्या ‘सॅफ’च्या बंधनातून नुकतेच मुक्त केले आहे.बँकेवरील मागील १० वर्षांचे सर्व निर्बंध आता हटवण्यात आले आहेत,अशी माहिती बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रसाद मुकणे यांनी दिली.या निर्बंधांमुळे बँकेच्या ग्राहक आणि सभासदांना सुविधा व लाभ देताना अडचणी येत होत्या. मात्र,आता निर्बंधमुक्त झाल्यामुळे बँकेच्या जलद विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे,असे मत बँकेचे विद्यमान चेअरमन निलेश पाटील यांनी व्यक्त केले.
बँकेतर्फे लवकरच फोन पे आणि गुगलपे सारख्या आधुनिक यूपीआय सेवा सुरू करण्यात येणार आहेत. बँकेच्या नवीन शाखा उघडणे आणि कॉर्पोरेट विमा एजन्सी घेणे आता शक्य होणार आहे.” या निर्णयांचा बँकेचे ग्राहक, सभासद आणि भागधारक यांना मोठा फायदा होणार आहे. हे यश भागधारक, खातेदार आणि हितचिंतक यांच्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळेच शक्य झाले, असे सांगून सर्व संचालकांनी त्यांचे आभार मानले.अल्पावधीत मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल जव्हार अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचे सर्वत्र मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

