नवीन पाटील,सफाळे
सफाळे रेल्वे फाटक क्र. ४२ बंद करण्या प्रकरणी
कृती समितीचे आमरण उपोषण सुरू,
पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ असलेले रेल्वे फाटक क्रमांक ४२ कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता ३१ मार्च २०२५ रोजी रेल्वे प्रशासनाने अचानकपणे बंद केले होते.त्यामुळे पादचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ कालपासून सफाळे विकास कृती समितीतर्फे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
रेल्वे फाटक क्रमांक ४२ हे बंद होऊ नये,यासाठी कृती समितीने वेळोवेळी रेल्वे प्रशासन,स्थानिक प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या. मात्र त्यावर फक्त आश्वासने देण्यात आल.प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली नाही, असे समितीचे अध्यक्ष सिकंदर शेख यांनी स्पष्ट केले.
४ एप्रिल २०२५ रोजी फाटक बंदीच्या विरोधात कृती समितीने आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी आणि डीआरएम यांनी खा.डॉ.हेमंत सावरा यांच्या समवेत बैठक घेतली होती.परंतु या बैठकीनंतरही प्रशासनाकडून फक्त आश्वासनेच मिळाली.समस्येचे समाधान मात्र होऊ शकले नाही.त्यामुळे समितीने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे समितीचे उपाध्यक्ष नचिकेत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कृती समितीच्या पुढील मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
जोपर्यंत पादचाऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नाही,तोपर्यंत फाटक पूर्ववत सुरु ठेवण्यात यावा.
बोईसर व उमरोळी रेल्वे फाटकांप्रमाणे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून फाटक सुरु ठेवण्यात यावा.
डीएफसीसीच्या वेळापत्रकानुसार सकाळी व संध्याकाळी फाटक सुरु ठेवण्यात यावे.
वरील मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे समितीचे सचिव स्वप्नील तरे यांनी जाहीर केले आहे.

