जव्हार प्रतिनिधी,
जगदंबा बोहाडा उत्सव ; १५ ते १७ मे २०२५ दरम्यान भव्य आयोजन,
जव्हार तालुक्यातील मौजे चालतवड येथे १५ ते १७ मे दरम्यान जगदंबा बोहाडा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या तीन दिवसीय धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात ग्रामस्थ,नातेवाईक, आजूबाजूच्या गावांतील भाविक आणि लोककला प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

या उत्सवात पारंपरिक सोंगे, आदिवासी लोककला सादरीकरण,मिरवणूक,आणि जगदंबा देवीचे पूजन,असे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.बोहाडा सोंगांचे संबळ वाद्य मिरवणूक,तसेच पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांचे सादरीकरण,ही या उत्सवाचे खास आकर्षण असते.त्यामुळे उपस्थित भाविकांना पारंपरिक आदिवासी सांस्कृतिक वारशाचा अनोखा अनुभव मिळतो.चालतवड गावातील सार्वजनिक जगदंबा बोहाडा उत्सव हे गावाचे गौरवशाली सांस्कृतिक वारसास्थान असून,शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही उत्साहात साजरी करण्यात येते.गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा उत्सव दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात होत आहे.यावर्षीचा उत्सवही गावकऱ्यांच्या ऐक्याचे,श्रद्धेचे आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक ठरणार आहे.यात्रोत्सवाच्या काळात गावात विविध स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे दुकान,खेळ व लहान मुलांसाठी आकर्षण ठरणारे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.कुटुंबांसह येणाऱ्या भाविकांसाठी हा एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.गावकऱ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे,आपल्या पिढीला आपल्या परंपरेची ओळख करून द्यावी,गावाच्या सांस्कृतिक समृद्धतेचा साक्षीदार व्हावे,असे आवाहन चालतवड येथील सार्वजनिक बोहाडा उत्सव समिती आणि ग्रामस्थांनी केले आहे.

