राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा,
महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आहे.जाने.२०२५पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राम नाईक यांना तीनदा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली,तरी अजूनही संपूर्ण विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आल्यामुळे राम नाईक यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.राम नाईक यांचा मत्स्य व्यवसाय संदर्भातील प्रदीर्घ अनुभव व समितीपुढे आलेल्या सूचना यामुळे मुख्यत्वे मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणे,ही काळाची गरज असल्याचे नाईक यांचे ठाम मत झाले होते.योगायोगाने समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वीच गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने याविषयी महत्वाचा निर्णय घेतल्यामुळे धोरण निश्चिती संदर्भातील अन्य कामांना अधिक विलंब नको,या हेतूने नाईक यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.आपल्या राजीनामा पत्रात नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे यांचेही आभार मानले आहेत.
प्रकृति अस्वास्थ्य असताना राजीनामा प्रत्यक्ष घेऊन येऊ नका मीच माझा प्रतिनिधि पाठवितो असे काल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री नाईक यांना दूरध्वनीवर सांगितले. त्यानुसार आज त्यांच्यावतीने आलेल्या प्रतिनिधीकडे श्री. नाईक यांनी राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी श्री. राम नाईक यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

