सचिन परब, विरार,
उसगाव येथे श्रमजीवी साहित्य मेळा २०२५ चे आयोजन,
आदिवासी आणि श्रमिक समुदायाच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उत्थानासाठी समर्पित श्रमजीवी साहित्य मेळा थाटात पार पडला.ज्येष्ठ साहित्यिक प्रेमानंद गज्वी,अशोक नायगावकर आणि महेश केळुस्कर यांच्या हस्ते या मेळ्याचे उद्घाटन झाले.श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळ्याने साहित्यप्रेमींसह सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.यावेळी उसगाव येथे असलेल्या फुलबाग वसतिगृहातील मुलींनी ” गीताई दिंडी, ” काढली.तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस गीताई अध्यायाचे सादरीकरण करण्यात आले.
उद्घाटन समारंभात विवेक पंडित,डॉ.मनोज रानडे,महेश केळुस्कर,प्रेमानंद गजवी, खासदार डॉ.हेमंत सवरा आणि अशोक नायगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विवेक पंडित आपल्या भाषणात म्हणाले,श्रमजीवी साहित्य मेळ्याच्या माध्यमातून आदिवासी आणि श्रमिक समुदायाच्या संघर्षांला आवाज देण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले, “ हा मेळा केवळ साहित्याचा उत्सव नाही, तर सामाजिक न्याय आणि समानतेच्या लढ्याचा एक भाग आहे.आदिवासी साहित्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे.” प्रेमानंद गजवी यांनी श्रमिक साहित्याच्या सामाजिक प्रभावावर प्रकाश टाकला आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, “ हे साहित्य समाजाला दिशा देणारे आहे.या मेळ्याद्वारे श्रमिकांचा आवाज बुलंद होईल.खा.डॉ.हेमंत सवरा यांनी आदिवासी संस्कृती आणि साहित्याच्या जतनासाठी अशा मेळ्यांचे महत्त्व असल्याचे सांगितले. उसगावच्या या संघर्ष भूमीने यापूर्वी अनेक दुःख व वेदना अनुभवल्या आहेत.आज असा आगळा वेगळा कार्यक्रम करून मराठी भाषेचा गौरव आपण केला आहे,असे ते म्हणाले.
डॉ.रानडे यांनी प्रशासकीय सहकार्याचे आश्वासन देताना आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणासाठी साहित्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले.उद्घाटन विवेक पंडित यांच्या ” मुके ते जन्मले होते,” या पुस्तकाचे प्रकाशन झाले.अशोक नायगावकर आणि महेश केळुस्कर यांनी हे पुस्तक ज्यांच्या वेदनांना आवाज नाही,अशांच्या वेदनांना आवाज देण्याचे काम करणाऱ्या एका अद्वितीय माणसाचे हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे,असे आवाहन केले.उद्घाटन समारंभाला विवेक पंडित,विद्युल्लता पंडित,श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा,खा.डॉ.हेमंत सवरा,आ.स्नेहा पंडित दुबे,आ.विलास तरे,आ.राजन नाईक,आ.हरिश्चंद्र भोये,आ.राजेंद्र गावित,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनोज रानडे,ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ,गझल सम्राट भीमराव पांचाळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष चौधरी,पोलिस निरीक्षक संजय हजारे,वनकोटी,उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे,तहसीलदार अविनाश कोष्टी आणि भाऊसाहेब अंधारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र पाटील यांनी केले.
समर्थन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी विवेक पंडित यांच्या लेखमाला आणि अनावृत्त पत्र यांच्यावर आधारित ” भाऊंचा लेख प्रवास,” असा अभिनव कार्यक्रम सादर केला.
या उद्घाटन समारंभाला शेकडो साहित्यप्रेमी,लेखक, कवी,पत्रकार आणि आदिवासी श्रमजीवी बांधव यांनी हजेरी लावली.आज “आदिवासी साहित्याचा इतिहास आणि भविष्य” आणि “श्रमिकांचे प्रश्न आणि साहित्य” यासारख्या विषयांवर साहित्यिक सत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहेत.


