तलासरी प्रतिनिधी,
तलासरी भागात बिबट्याचा दोघांवर हल्ला,
तलासरी भागात बोर्डी वनविभागाच्या हद्दीत बिबट्याने हल्ल्यात दोन जण जखमी झाले.त्यांना तात्काळ तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी गुजरात राज्यातील बलसाड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
घटनेची खबर लागताच तलासरी पोलीस आणि बोर्डी वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी घटना स्थळी पोहोचले.
आज सकाळी साडेआठच्या सुमारास शेतात पाला गोळा करण्यास गेलेल्या गुलाब मधुकर वरठा,रा.करजगांव, मानपाडा येथे राहणाऱ्या महिलेवर बिबट्याने अचानक मागून हल्ला केला.यावेळी प्रसंगावधान राखून त्या महिलेने हल्ला परतवून लावला आणि आरडाओरड केली, त्यामुळे बिबट्या पळून गेला.यात महिलेच्या पाठीवर आणि हातावर गंभीर दुखापत झाली.याघटनेनंतर थोड्याच वेळात बिबट्याने धामणगाव आपटोलपाडा येथे आपल्या वाडीत काम करणाऱ्या राज्या काकड्या चिमडा,यांच्यावर बिबट्याने जोरदार हल्ला केला.राज्या याने हा हल्ला देखील पूर्ण ताकदीने परतवला. पण यामध्ये त्यांच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या. या हल्ल्यातील जखमीना नातेवाईकांनी तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यानंतर अधिक उपचारासाठी गुजरात राज्यातील बलसाड येथे पाठवण्यात आले आहे.
या दोन्ही घटनांनंतर वनविभाग आणि वाईल्डलाईफ विभागाने तातडीने शोध मोहिम राबवली आहे.बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे,अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गावकरी वाड्यांमध्ये काम करताना किंवा रस्त्यावरून जाताना गटागटानेच जाण्याचा निर्णय घेतला आहे. वनविभागाकडून देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शक्यतो एकटे न जाता, एकमेकांची साथ घेऊन वावरावे, आणि वाड्यांमध्ये काम करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जंगले राखण्यात वनविभाग कुछकामी ठरत असून, जंगले नामशेष होत असल्याने वन्य प्राणी आपले भक्ष शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत आहेत.वनविभाग दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करते,पण करोडो रु. खर्च करूनही वनाची वाढ होत नाही,वनजमिनीवर होत असलेले अतिक्रमण आणि वन विभागाच्या नाकर्तेपणामुळे जंगलाच्या ऱ्हासला करणीभूत ठरले आहे.

