संजय लांडगे,वाडा
वाड्यात अक्षय तृतीया निमित्त आयोजित शिवजयंती उत्साहात साजरी,
शिवसेना ( उबाठा ) वाडा शाखेतर्फे अशोकगड येथे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर शिवपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेत्या ज्योती ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवचरित्राचा माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहचवणे, त्यांचे विचार,त्यांचा इतिहास प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज असल्याचे मत ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले.
स्व.धर्मवीर आनंद दिघे यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी शिवजयंती साजरी करण्याची परंपरा चालू केली.वाडा शहर शाखेतर्फे दरवर्षी ती उत्साहात साजरी केली जाते.
ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष कुंदन पाटील,पालघर जिल्हाप्रमुख अनुप पाटील जिल्हा संपर्कप्रमुख निलेश गंधे,जिल्हा समन्वयक प्रकाश केणे,तालुका अध्यक्ष निलेश पाटील,शहर अध्यक्ष प्रमोद घोलप,माजी नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर,माजी नगरसेविका वर्षा गोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.पाहुण्यांचे मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत,सत्कार करण्यात आला. सायंकाळी जयंतीनिमित्त वाड्यातील अशोकगड येथून मिरवणूक निघून आगर आळी,वाणी आळी,परळी नाका,मुख्य बाजारपेठ,बस स्थानक, खंडेश्वरी नाका ते पुन्हा अशोकगड,अशी भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणूकीत घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हुबेहूब दर्शन झाले.मिरवणुकीत ऐतिहासिक वेशभूषेत मावळे, घोडे हे विशेष होते तर तारपा नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

