नदीम शेख,पालघर
शरीर स्वास्थासाठी प्रत्येकाने खेळायला हवे – जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड,
आपलं शरीर सुदृढ राहावे, यासाठी प्रत्येकाने खेळामध्ये रुची दाखवली पाहिजे.खेळामुळे व्यक्तिमत्व खुलते,बुद्धिमत्ता तरल होते.मानसिक स्वास्थही सुदृढ राहते.त्यासाठी प्रत्येकाने खेळायला हवे.असा मौलिक सल्ला जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील शिबिरार्थींना दिला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघरतर्फे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पालघर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानावर करण्यात आले असून या शिबिराच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू गिरीश इरनाक,आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर अभिजीत गुरव व जयवंती देशमुख आदी उपस्थित होते.
प्रत्येक मुलाने दरवर्षी एक नवीन खेळ खेळायला शिकले पाहिजे.खेळल्यामुळे आपली शारीरिक क्षमता वाढते.आणि तुम्ही लठ्ठ न होता सुदृढ राहता,मोबाईलपासून आपण सगळ्यांनी दूर राहिले पाहिजे,नवीनवीन खेळ बघत चला.त्याच्यामुळे आपल्याला नवीन माहिती उपलब्ध होते.आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय खेळाडू झाला तर तुम्हाला केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात,असे त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थींना सांगितले व त्यांच्याशी संवाद साधला.
सोळा दिवस चालणाऱ्या या शिबिरांमध्ये मैदानी खेळ एथलेटिक्स) फुटबॉल, कबड्डी,जिम्नॅस्टिक पॉवर लिफ्टिंग,वेटलिफ्टिंग, सॉफ्टबॉल,बेसबॉल,खो-खो, बॅडमिंटन,व्हॉलीबॉल,शूटिंग व आर्चरी अश्या ११ खेळांचा समावेश आहे.सकाळच्या सत्रामध्ये सात ते नऊ व संध्याकाळच्या सत्रात चार ते सहा,अशा दोन सत्रांमध्ये या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये जवळपास ५०० खेळाडू सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात खेळातील प्राथमिक ज्ञान व कौशल्य अवगत होण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व एम्स स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई,यांच्या संयुक्त विद्यामाने तालुका निहाय आदिवासी शाळातील १० ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा कौशल्य शोध ( स्पोर्ट्स टॅलेंट हंट ) हा उपक्रम राबवण्यात आला होता.आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक अजित कुलकर्णी व त्यांचे सहाय्यक संघ यांच्या माध्यमातून मोखाडा, विक्रमगड,जव्हार,वाडा, तलासरी,पालघर,वसई ग्रामीण येथील २०० आदिवासी शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला होता. यामध्ये जवळपास ६० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता,असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किरण थोरात यांनी केले.

