वसंत भोईर,वाडा
गडांतरानंतरही टायर रिसायकलिंग कंपन्या जोमात
तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात टायर रिसायकलिंगच्या कंपन्या सुरू असून या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. यासंदर्भात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात तक्रारी झाल्यानंतर अनेक टायर कंपन्यांवर गडांतर आले.तरीपण नव्याने असंख्य कंपन्यांचे उभारणीचे काम जोमाने सुरू आहे.यात प्रामुख्याने वडवली,दिनकर पाडा,तोरणे,सपना,वरले, कोणे,पालसई आदी गावांमध्ये नव्याने कंपन्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
या कंपन्यांमध्ये वारंवार अपघात होऊन अनेक कामगार जायबंदी झाले तर अनेकजण मृत्युमुखी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत.प्रचंड होणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.टायर कंपनीच्या प्रदूषणाने हैराण झालेल्या नागरिकांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केलेल्या तक्रारीची त्यांनी गंभीरपणे दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे काही कंपन्यांना टाळी लावावी लागली.नागरिकांच्या वाढत्या रोषामुळे टायर कंपन्यांवर गडांतर आले असतानाही दिवसागणिक असंख्य कंपन्या उभारण्यात येत आहेत.सदर बाब वाडा तालुक्यातील नागरिकांसाठी धोक्याचे असल्याचे जाणकारांचे मत आहे.
गावात येणाऱ्या कंपन्या काय उत्पादन करतात आणि त्यापासून विषारी सांडपाणी,निघणारा धूर यामुळे कसे प्रदूषण होईल किंवा कसे या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच परवानगी द्यायला हवी अन्यथा नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार ठरू शकतो.
– डॉ.अरुण सावंत, पर्यावरण तज्ञ,माजी प्र. कुलगुरू,मुंबई विद्यापीठ
.

