जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे आदिवासी समाजाचे एकता व सांस्कृतिक महासंमेलन संपन्न,
आदिवासी कोकणा,कोकणी व कुकणा समाजाच्या वैचारिक एकता व सास्कृतिक महासंमेलन आज जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियम येथे संपन्न झाले.
या वैचारिक व सांस्कृतिक महासंमेलनाचा मुख्य उद्देश समाजातील अन्याय,अत्याचाराचा निषेध करणे तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर उपाययोजना करणे असा होता.सदर मेळाव्याची सुरुवात हनुमान पॉइंट येथील खंडेराव मंदिरापासून भव्य सांस्कृतिक महारॅलीने झाली.रॅलीमध्ये कोकणा,कोकणी व कुकणा जमातीतील पारंपरिक देवदेवतांचे सादरीकरण, आदिवासी वाद्यांचा गजर,तारपा,पावरी नृत्य,सांबळ नृत्य,गौरी नाच, महिला डोक्यावर गौरी घेवून पारंपरिक पोशाखात सहभागी झाल्या होत्या.अंबिका चौक, तारपा चौक,गांधी चौक, पाचबत्ती नाका,यशवंत नगर मार्गे आदिवासी क्रांतिकारक चौक ते राजीव गांधी स्टटेडियम पर्यत पायी रॅली काढण्यात आली.रॅलीमध्ये हजारो संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.यानंतर राजीव गांधी स्टेडियम येथे भव्य वैचारिक व सांस्कृतिक महासंमेलनाचे उद्घाटन हिरवा देव व आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी यांची ११५ वी जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवधून त्रैमासिकचे प्रकाशन व वधू -वर सूचक ऑनलाईन अँपचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी कोकणा,कोकणी, कुकणा इतिहास,कोकणा समाजाची सद्यस्थिती आव्हाने,संविधानातील आदिवासींचे हक्क,समाज संघटन व संघटनेचे महत्व, आदिवासी उपस्थिती आजी-माजी लोकप्रतिनिधीनी आपल्या मनोगतामध्ये कोकणा समाजाने सांस्कृतिक, शैक्षणिक,सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच यावेळी कोकणा सामाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व उच्च शिक्षण घेऊन पुढे आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.कोकणा समाजातील डांगी नृत्य,पावरी नृत्य,डोंगऱ्यादेव नृत्य,तारपा नृत्य, कोकणा नृत्य ( तापी ) डेरा वाद्य,मांदळ नृत्य,विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.तसेच विविध वस्तूचे प्रदर्शन विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले होते.सदर वैचारिक व सांस्कृतिक एकता महासंमेनाचे संमेलनाध्यक्ष संदीप साठे,उद्घाटक विक्रमगड विधानसभा आ.हरिश्चंद्र भोये,मुंबईचे मुख्य अभियंता मेरीटाईम बोर्ड मुंबई सुरेंद्र टोपले,माजी आ.सुनील भुसारा,माजी खा.बापूसाहेब चौरे,नाशिकच्या माजी महापौर रंजना भानसी,निवृत्त आयुक्त (आदिवासी विकास ) टी. के. बागुल,आदिवासी समाजसेवक लक्ष्मण टोपले, माजी कोकणा अध्यक्ष रामचंद्र कामडी,माजी सभापती विजयाताई लहारे,पालघर जिल्ह्याचे माजी बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी,माजी सदस्या सुनीता धूम,माजी सदस्या गुलाब विनायक राऊत,आदिवासी समाज सेविका सरस्वती भोये, लक्ष्मीबाई भोये,मिराबाई महाले ,हिरामण झीरवाळ ओएसडी मुंबई,एन.डी. गावित आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभेत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. त्यामध्ये,
कोकणा समाजातील महिलांचे कुटुंब,व्यवसाय,नोकरी व राजकारणातील स्थान मजबूत करणे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समस्या आणि त्यावरील उपाययोजना.
कोकणा समाजाच्या रूढी-परंपरा,सण-उत्सव, देवदेवतांची माहिती व जतन.
युवक-युवतींच्या उच्च शिक्षणासाठी (NET, Ph.D., UPSC, MPSC, GPSC) योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन.
आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहासंबंधी समस्या व उपाय.
आदिवासी भागातील विकास प्रकल्पांमुळे होणारे स्थलांतर आणि त्याचा कुटुंबांवर होणारा परिणाम.
आदिवासी समाजातील आरोग्य,कुपोषण व गरिबी यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना.
सदर वैचारिक व सांस्कृतिक एकता महासंमेलनामुळे आदिवासी कोकणा,कुकणी, कोकणी समाजातील बांधवांना नवचेतना मिळाली असून,समाजाच्या उन्नतीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे आयोजनासाठी आदिवासी कोकणा,कोकणी व कुकणा केंद्रीय कोअर कमेटी व आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान,पालघर व समस्त कोकणा समाजबांधव पालघर जिल्हा यांनी विशेष मेहनत घेतली.

