संदीप जाधव,बोईसर
सूर्या नदीसाठी जनआक्रोश ; पांजरेत करमतारा कंपनीविरोधात जोरदार एल्गार,
बोईसर पूर्व परिसरात सूर्या नदीचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आणि बोईसर, तारापूर वसई-विरार परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी स्थानिक नागरिकांनी करमतारा कंपनीच्या विरोधात पांजरे येथे सभेचे आयोजन केले होते.
रविवारी दुपारी अकराच्या सुमारास हे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विविध सामाजिक संघटनांचे नेते आणि नागरिकांनी नव्याने होवू घातलेल्या करमतारा कंपनीला या परिसरात पाय रोवू देणार नाही,असा निर्धार व्यक्त केला.
उलगुलान ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंगाडा,मनसेचे पालघर जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी,भूमी सेनेच्या नेत्या नीता काटकर,आदिवासी एकता परिषदे नेते दत्ता करबट, सामाजिक कार्यकर्ते रमेश डोंगरे,वैभव पाटील,कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,संजय पाटील,रोहन पाटील,लोकशाहीर गंगाराम घरत,जयस संघटनेचे नेते प्रसाद पराड,भरत भोईर,डॉ. अनंत हाडल,किरण राऊत यांच्यासह शेकडो महिला व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
सूर्या नदीच्या पात्राजवळ लोखंडावर प्रक्रिया करण्यासाठी झिंक व गंधकासारखे घातक रसायने सोडणाऱ्या करमतारा कंपनीचा घाट घालण्याचा डाव उधळून लावण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. “करमतारा रद्द करा!”, “सूर्या नदी वाचवा!”, “आमच्या आरोग्याशी गद्दारी नको!” अशा घोषणा देत नागरिकांनी परिसर दणाणून सोडला होता.
उलगुलान ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंगाडा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ” नदीचे आणि आमचे नाते माय-लेकाचे आहे.सूर्या नदीच्या पाण्यात विष मिसळणाऱ्या कोणत्याही कंपनीला येथे वाव मिळणार नाही.वेदांता कंपनी विरोधातील लढा आम्ही जिंकलो,तसाच करमतारा विरोधातही लढू.”असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सभेत नागरिकांनी सांगितले की,जागतिक स्तरावर करमतारा कंपनीच्या उत्पादनांवर बंदी आहे.तरीही अशी कंपनी येथील शुद्ध पाण्याच्या स्रोताजवळ आणण्याचा प्रयत्न चालू आहे, हे सरकारच्या निष्क्रियतेचे मोठे लक्षण आहे.गुंदले गावातील प्रवीण पाटील यांनी म्हटले, ” खेड्यापाड्यांतून वाहणाऱ्या शुद्ध पाण्याचे स्त्रोत दूषित करायचे,हे सरकारचे षडयंत्र आहे का ? ” डॉ.अनंत हाडल यांनी दलालामार्फत आदिवासींच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेऊन कंपनी थाटण्याच्या कारस्थानाचा निषेध केला. किरण राऊत यांनी औद्योगिक प्रक्रियेमुळे होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणाचा नागरिकांवर होणारा दुष्परिणाम उदाहरणासह मांडला.
परिसरातील लाईफलाईन वाचवण्यासाठी ठाम लढा देणार असून ” सूर्या नदी वाचवण्यासाठी आणि शुद्ध पाण्याच्या स्त्रोताचे रक्षण करण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू.करमतारा कंपनीला या पवित्र भूमीत प्रवेश देणार नाही,” असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.
Trending
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,

