सुरेश काटे,तलासरी
अणवीर गावात प्लास्टिक बंदी जनजागृती आणि स्वच्छता अभियान,
यशराज रिसर्च फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि ग्रुप ग्रामपंचायत अणवीर-सावरोली यांच्या सहकार्याने “ पर्यावरण बचाव वसुंधरा सजाव,” हे स्वच्छता अभियान अणवीर गावात राबवण्यात आले.या अभियाना दरम्यान रस्त्याच्या आजू बाजूचा भाग,आरोग्य केंद्र, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी साचलेले प्लास्टिक व इतर कचरा उचलण्यात येवून गावाची स्वच्छता करण्यात आली.तसेच गावात रॅली काढून पर्यावरण विषयी संदेश देण्यात आले.याअभियानात गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका,शाळांमधील शिक्षक,विद्यार्थी,यशराज रिसर्च फाउंडेशन टीमचे सदस्य यांनी उत्साहाने सहभागी झाले होते.या उपक्रमाचे नियोजन यशराज रिसर्च फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक संतोष काठोळे आणि त्यांच्या टीमने केले.
पर्यावरणाची होणारी हानी थांबवून त्याचे संवर्धन करणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी जागतिक वसुंधरा दिना निमित्त यशराज रिसर्च फाउंडेशनतर्फे अणवीर गावात वेगवगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये कुल स्कूल म्हणून शाळेत वृक्ष लागवड,चालता फिरता बोलका रेडीओ,प्राणी व पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चिमण्यांसाठी घरटी,इ.चा त्यामध्ये समावेश आहे,अशी माहिती संस्थेचे प्रोग्राम लीडर नामदेव गुलदगड यांनी दिली.

